पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज मंगळवार अहमदाबादमध्ये एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. अहमदाबादमधील सरदार वल्लभाई पटेल संग्रहालयाच्या उदघाटन कार्यक्रमात मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणारे हे कट्टर विरोधी नेमके काय बोलतील? याकडे लक्ष लागून राहीले आहे.
हे संग्रहालय ‘सरदार वल्लभाई पटेल मेमोरिअल सोसायटी’ यांच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. तसेच दोन दिवसांनंतर ३१ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी सरदार सरोवर येथे सरदार वल्लभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याची उभारणी सुरूवात म्हणून भूमीपूजन करणार आहेत. भारताचे पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार असून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे स्मारकाचे नामकरण करण्यात येणार आहे. हे स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’पेक्षाही उंच असेल असे नरेंद्र मोदींनी याआधी जाहीर केले आहे.