पुढील महिन्यापासून गोव्यामध्ये कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना अथवा घाण करताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली आहे. याबाबतचं सविस्तर नोटिफिकेशन लवकरच गोवा सरकार काढणार आहे, असं पर्रिकर म्हणाले. येत्या १५ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाईला सुरूवात व्हावी यासाठी मी प्रयत्न करेल, असंही त्यांनी सांगितलं.

पर्रिकर म्हणाले, ”ऑगस्ट महिन्यापासून जर कोणी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. जवळपास २५०० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. लवकरच त्यासाठी योग्य ती पावलं उचलणार आहोत. ऑगस्टमहिन्याआधीच हे करण्याची माझी इच्छा आहे, त्यामुळे १५ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाईला सुरूवात करता येईल. याशिवाय घाण करताना कोणी आढळल्यास त्याच्यावरही अशीच कारवाई केली जाईल.

यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन लोक दंगा करतात. त्यामुळे इतरांना त्रास होतो म्हणून गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. याआधी बीचवर दारू पिण्यावर बंदी घालण्यात आली होती.