मलेशियाच्या बेपत्ता विमानाच्या प्राथमिक चौकशी अहवालाच्या निमित्ताने जे नकाशे प्रसृत करण्यात आले आहेत, त्यानुसार मलेशियन जेट विमानाने हेतुपुरस्सर लष्करी रडारना टाळण्यासाठी मार्ग बदलला असे दिसून आले आहे. मलेशियाने प्राथमिक अहवाल जाहीर केला असून त्यात असे म्हटले आहे, की विमानाने जमिनीवरून उडण्याचे टाळावे व ज्याचे स्पष्टीकरण करता येणार नाही असे पश्चिमेकडे वळण घेतले. त्याचा मार्ग हा लष्करी रडारना टाळण्यासाठीच तयार करण्यात आला होता असे टेलिग्राफने म्हटले आहे. मलेशिया सरकारने प्राथमिक अहवालात असे म्हटले आहे, की नकाशानुसार वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रक यंत्रणेच्या नजरेतून सुटण्यासाठी वेगळाच मार्ग पकडला. विमानाने पूर्वी ठरल्याप्रमाणे काहीच न करता थेट मलाक्काच्या सामुद्रधुनीवरून भरारी घेत नंतर वळण घेतले. त्यानंतर ते सात दक्षिणेकडील सागरावरून म्हणजे हिंदी महासागरावरून फिरत होते. हे विमान सुमात्राच्या उत्तर टोकाकडून गेले असले तरी त्याने इंडोनेशियाच्या प्रदेशावरून जाणे टाळले, हवाईउड्डाणतज्ज्ञ डेव्हिड लर्नमाऊंट यांच्या मते त्या विमानाचा जो मार्ग होता त्यावरूनच त्याला लष्करी रडारचा ससेमिरा चुकवायचा होता हे स्पष्ट होते. इंडोनेशियाच्या हवाई दलाने हे विमान कुठे चालले आहे यावर लक्ष ठेवू नये यासाठी त्यांनी इंडोनेशियावरून जाण्याचे टाळले. हवेत कुठली ठिकाणे ठरलेली नसतात. वैमानिकाने बेछूटपणे विमान दामटले, कुठल्याही नियमांचे पालन केले नाही असे ते म्हणाले. विमान रडारच्या कक्षेबाहेर गेले आहे हे सतरा मिनिटे हवाई नियंत्रक कक्षाला समजले नाही, त्यामुळे मदतकार्य चार तास सुरूच होऊ शकले नाही. पण या विमानाने नेहमीचा मार्ग का सोडला याचे स्पष्टीकरण अहवालात दिलेले नाही. मलेशियात पोलिस तपास चालू आहे, पण वैमानिक किंवा सहवैमानिक दहशतवादाशी संबंधित होते किंवा त्यांचे मानसिक संतुलन ढळलेले होते असे काही सूचित होत नाही असे अहवालात म्हटले आहे.
पुढील तपास ठरवण्यासाठी ऑस्ट्रेलिया,मलेशिया आणि चीन चर्चा करणार
मलेशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे तपासाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मलेशिया, चीन आणि ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ अधिकारी पुढील आठवडय़ात कॅनबेरा येथे भेटणार आहेत. या भेटीत विमानाच्या तपासाबाबतची पुढील दिशा ठरवण्यासाठी नव्याने चर्चा करण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे तपास मोहिमेचे समन्वयक अँगस हस्टन यांनी सांगितले की, २३९ प्रवाशांसह ८ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या विमानाच्या शोधासाठी संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तरी या तपासाला साधारणपणे ८ ते १२ महिने लागतील. आम्ही शोधकाम अविरत सुरूच ठेवणार असल्याचेही हस्टन यांनी सांगितले.
कॅनबेरा येथे होणाऱ्या बैठकीत विद्यमान तपासकार्याचा आढावा घेऊन नवी रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचेही हस्टन यांनी सांगितले.
तोपर्यंत बेपत्ता विमानाचे अवशेष सापडत नाहीत. तोपर्यंत रोबोटिक पाणबुडीच्या साहाय्याने हिंदी महासागरातील शोधकार्य सुरूच ठेवण्यात येणार असल्याचेही हस्टन यांनी सांगितले. आम्ही लवकरच हे विमान शोधू, असा विश्वासही हस्टन यांनी व्यक्त केला आहे.