राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या व्यथा राजधानीत
‘मी तीन वर्षांची असताना माझ्या बाबांनी आत्महत्या केली. ते तर गेले. मात्र आमची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. स्वतच पोट भरायचं की शिकायचं..’, एवढे वाक्य बोलून पल्लवीचा कंठ दाटून आला. पुढचं ती बोलूच शकली नाही.. चार वर्षांच्या आरुषची कथा तर आणखीन हृदयद्रावक.. त्याला तर वडिलांचे नावही माहीत नाही.. तो जन्माला येण्याआधीच वडिलांचे छत्र हरपलेले.. या सर्वाचे दुख एकच.. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांच्या वडिलांनी केलेली आत्महत्या.. अनेकांची वडिलांसंदर्भातील आठवण म्हणजे झाडाला टांगलेला निष्प्राण देहच!
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या व्यथा राजधानी दिल्लीतही समजाव्यात, त्यांचे दुख सर्वानी ऐकावे, त्यातून बोध घ्यावा, अंतर्मुख व्हावे, तसेच या मुलांच्या मागण्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने महाराष्ट्रातील ४० मुलांना येथे जंतरमंतरवर आणण्यात आले आहे. डोईवरचे केस काढलेले, कोणाच्या डोळ्यांत चमक तर कोणाच्या डोळ्यांत निरागसतेचे भाव.. प्रत्येकाची कहाणी वेगवेगळी. कारण मात्र एकच.. वडिलांची, क्वचितप्रसंगी आई-वडील दोघांचीही, आत्महत्या. ‘आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले’, ‘कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा काही तोडगा नव्हे’, ‘शेतीला उद्योगाचा दर्जा द्या’, अशी घोषवाक्ये असलेले फलक त्यांच्या हातात दिलेली. आमच्याकडे लक्ष द्या, एवढीच त्यांची मागणी. ‘माझ्या वडिलांची केळीची बाग होती. परंतु त्यातून त्यांना पुरेसे उत्पन्न मिळेना. पैशांवरून काही जण शेतकऱ्यांशी हुज्जत घालतात, एजंट त्यांची फसवणूक करतात, कर्ज फेडण्यासाठी बँका त्यांच्यामागे लकडा लावतात. या सगळ्याला वैतागून एके दिवशी शेतकरी आत्महत्या करतो आणि त्याचे कुटुंबीय उघडय़ावर पडते. माझ्याही वडिलांनी तोच मार्ग पत्करला’, नववीत शिकत असलेली पल्लवी पवार सांगते. १४ वर्षांच्या गंगाकृष्ण पाचवीत असताना त्याच्या वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. काहीजणांना आठवतो तो फक्त वडिलांचा निष्प्राण देह! अशोक, बाळकृष्णे चंद्रकांत, ज्ञानेश्वर आणि इतरांच्या कथा आणि व्यथाही थोडय़ाबहुत फरकाने अशाच.
मध्य प्रदेशातील मंदसौर येथून निघालेल्या ‘अखिल भारतीय किसान संघर्ष समिती’ची शेतकरी यात्रेत सहभागी झालेली ही मुले दिल्लीतील एका सरकारी शाळेत थांबली आहेत. त्यांच्याबरोबर असलेल्या स्वराज इंडिया या स्वयंसेवी संस्थेचा कार्यकर्त्यांने माहिती पुरवली ‘सद्यस्थितीत या शाळेत ४०० निवासी आहेत. आणखी शेकडोजणांना त्यात प्रवेश हवा आहे. ही परिस्थिती भयानक आहे’. स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी या भयावह परिस्थितीवर बोट ठेवताना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करणे परवडणारे नसल्याचे नमूद केले.
शहरात राहणाऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आंदोलने म्हणजे वाहतूककोंडीला आणखी एक कारण. आंदोलनाकडे पाहण्याचा हाच दृष्टिकोन आम्हाला बदलवायचा आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे पुढे काय होते, हे लोकांना समजावे म्हणून या मुलांना आम्ही दिल्लीत आणले आहे. यांच्या कहाण्या ऐकून तुम्ही व्यथित होणार नसाल तर मग कठीणच असेल. – अनुपम, स्वराज इंडिया.