Reddit Post Of Married Man About Wife: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर दररोज असंख्य युजर्स आपापले विविध प्रकारचे अनुभव शेअर करत असतात. अशात नुकतेच एका तरुणाने त्याच्या वैवाहिक जीवनाविषयीचे अनुभव सांगणारी एक पोस्ट रेडिटवर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, लग्नात फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.

एका २८ वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजीनिअरने, या पोस्टमध्ये तो त्याच्या वैवाहिक जीवनात असमाधानी असल्याचे म्हटले आहे. लग्नाच्या काही महिन्यानंतर पत्नीविषयीची एक बाब समजल्यानंतर त्याला असे वाटू लागल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

लग्नापूर्वी या तरुणाची अपेक्षा होती की, आपल्याला नोकरदार पत्नी मिळावी, तो जितके कमावतो त्याच्या तुललने तिने ७० टक्के तरी कमाई करावी, ज्यामुळे घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणे सोपे होईल. पण, त्याची मासिक ७५ हजार रुपये कमाई करणारी पत्नी तिच्या पालकांचे गृहकर्ज फेडण्यासाठी त्यांना दर महिन्याला ४० हजार देत असल्याचे त्याला समजले आहे. पोस्टमध्ये त्याने स्पष्ट केले आहे की, लग्नापूर्वी पत्नीने त्याला याबाबत कोणतीही कल्पना दिली नव्हती. या प्रकरामुळे या तरुणाला त्याची फसवणूक झाली असल्याचे वाटू लागले आहे.

रेडिटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये हा सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण म्हणाला की, “मला, माझी फसवणूक झाल्याचे वाटत आहे. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मी घराचा ७० टक्के खर्च भागवत आहे. यावर मी तिच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. पण, प्रत्येकवेळी ती भावनिक होते आणि मी तिला प्रश्न विचारल्यामुळे खलनायक ठरतो.”

या तरुणाने पोस्टमध्ये असेही स्पष्ट केले आहे की, त्याला सासरकडच्या संपत्तीतील कोणताही हिस्सा नको आहे. याचबरोबर, यापूर्वी कधीही अडकला नाही अशा जाळ्यात अडकल्याच्या त्याच्या भावना निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान, या तरुणाच्या पोस्टवर अनेकांची मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील काहींनी तरुणाची बाजू घेतली आहे. तर, काहींनी त्याच्या पत्नीची बाजू घेतली.

एक युजर म्हणाला, “पत्नीला विचारा की, तिचे पालक हे घर तिच्या नावावर करणार आहेत का? ती पालकांचा हप्ता भरल्यानंतर राहिलेले पैसे घरखर्चासाठी देऊ शकते. ती जशी तिच्या पालकांना पैसे देते, तसेच तुम्ही तुमच्या पालकांना दिले, तर ते पत्नीला चालणार आहे का हे सुद्धा विचारा.”

यावेळी एका जुजरने म्हटले की, “ते तिचे पैसे आहेत. ती ते पैसे तिला जसे हवे आहेत, तसे खर्च करू शकते. शेवटी प्रमाणिक वैवाहिक आयुष्य म्हणजे घरासाठी दोघांनीही तेवढाच खर्च करणे नसते.”