उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची धुळधाण उडेल आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वाखाली समाजवादी पक्ष (सप) पुन्हा सत्तेत येईल, असे भाकित माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी वर्तवले आहे. काटजू यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून यासंदर्भात भाष्य केले आहे. आगामी निवडणुकीत समाजवादी पक्ष दोन तृतीयांश इतक्या मताधिक्याने निवडून येईल, असा दावाही काटजू यांनी केला आहे. तसेच या निवडणुकीत भाजपची पुरती धुळधाण उडेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशसह बहुतांश राज्यांमध्ये धर्म आणि जातीच्या आधारावर मतदान केले जाते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी मोदी लाटेप्रमाणे अपवाद वगळता याठिकाणच्या मतदानाचा आलेख सारखाच राहिलेला आहे. सध्या याठिकाणी अशाप्रकारची कोणतीही लाट नसल्यामुळे जात आणि धर्म या पारंपरिक मुद्द्यांवरच मतदान केले जाईल. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अशाप्रकारची लाट निर्माण होईल, अशी भाजपला अपेक्षा होती. मात्र, तसे काहीही घडले नाही. याउलट सामान्य जनता, लहान आणि मोठे व्यापारी आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागल्याने भाजपला नोटाबंदीच्या निर्णयाचा फटकाच बसण्याची शक्यता अधिक आहे. भाजपला या निवडणुकीत केवळ २६ टक्केच मते मिळतील. याठिकाणी सत्ता मिळविण्यासाठी ३० टक्के मतांची आवश्यकता आहे. याशिवाय, बसपला २२ टक्के मिळतील तर याठिकाणी काँग्रेसची मतपेढी नसल्यामुळेच त्याचाही फायदा अखिलेश यांनाच मिळेल, असे काटजूंनी सांगितले.

लोकसभेत ८० खासदार पाठविणाऱ्या उत्तर प्रदेशच्या जनमत कौलाची सर्वाना उत्सुकता आहे. त्यातच समाजवादी पक्षात यादवी चालू असल्याने तेथील चित्र आणखीनच संभ्रमात टाकणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव व बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांच्यातील रणधुमाळीने उत्तर प्रदेश घुसळून निघणार असला तरी दोन प्रतिष्ठित संस्थांनी घेतलेल्या जनमत चाचण्यांमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही.