देशातील आघाडीची कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (MSI) नव्याने बाजारात आणलेल्या वॅगन-आर हॅचबॅक फोर्थ जनरेशन कारमध्ये त्रुटी आढळल्याने कंपनीने तब्बल ४०,६१८ कार्स परत मागवल्या आहेत. या मॉडेलच्या १.० लिटर पेट्रोल इंजिनच्या फ्युएल होज मॅकॅनिझममध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे.

यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या आपल्या स्टेटमेंटमध्ये MSI ने म्हटले की, १५ नोव्हेंबर २०१८ आणि १२ ऑगस्ट २०१९ या काळात तयार झालेल्या कार्सच्या लॉटमध्ये ही समस्या आढळून आली आहे. त्यामुळे MSIचे डिलर्स २४ ऑगस्ट २०१९ पासून या कार्सच्या मालकांना संपर्क साधणार आहेत तसेच त्यांना आपल्या कारची तपासणी करुन घेण्याचे आवाहन करणार आहेत. त्याचबरोबर संबंधीत कारमधील fuel hose fouling with metal clamp मध्ये बिघाड असल्यास त्यांना तो मोफत बदलून दिला जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे. कंपनी जागतिक स्तरावर या कार्सच्या तपासणीची मोहिम राबवणार आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

मारुती सुझुकीने मध्यवर्गीयांमध्ये प्रसिद्ध असलेली वॅगन-आर कार नव्या बदलांसह आणि सुविधांसह भारतात लॉन्च केली आहे. ही नवी कार कॉम्पॅक्ट हॅचबॅकसह दोन इंजिनांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये १ लिटर, ३ सिलिंडर पेट्रोल इंजिन आणि १.२ लिटर, ४ सिलिंडर पेट्रोल मोटरचा समावेश आहे. या दोन इंजिनांसह ५ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सही यामध्ये आहे. तर काही निवडक कार्समध्ये ५ स्पीड AMT युनिटही देण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर या नव्या वॅगन-आरमध्ये पहिल्यांदाच स्टेअरिंगवरच ऑडिओ कन्ट्रोल बटनासह टचस्क्रीन इन्फोटेन्मेट सिस्टम अॅन्ड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्लेसह देण्यात आले आहे. त्याचबरोबर नवी वॅगन-आर ही जुन्या कारपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. सुरक्षेसाठी कारमध्ये दोन एअर बॅग्ज, ईबीडीसह एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर्स, ड्राईव्हर आणि पॅसेंजर्ससाठी सीट बेल्ट, अतिवेगाची इशारा देणारी यंत्रणा उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत ४.३४ लाख ते ५.९१ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.