Mass Suicide तीन मुलांसह आई वडिलांनी मृत्यूला कवटाळल्याची घटना अहमदाबादमध्ये घडली. ही सामूहिक आत्महत्येची घटना आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. विपुल वाघेला आणि त्याच्या कुटुंबाचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की आर्थिक चणचण भासू लागल्याने या दोघांनी मुलांसह आत्महत्या केली असण्याची दाट शक्यता आहे.
नेमकी काय घटना घडली?
विपुल वाघेला आणि त्याचं संपूर्ण कुटुंब आज सकाळी त्यांच्या अहमदाबादमधील घरात मृतावस्थेत आढळलं. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या पाचही जणांना रुग्णालयात नेणलं. पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विपुल वाघेला, त्याची पत्नी सोनल वाघेला आणि तीन मुलं करीना, मयूर आणि प्रिन्सी या सगळ्यांचा या घटनेत मृत्यू झाला. या सगळ्यांचे मृतदेह त्यांच्या घरातल्या पलंगांवर पडलेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
वाघेला यांच्या नातेवाईकांनी काय सांगितलं?
गेल्या काही दिवसांपासून वाघेला कुटुंबाला आर्थिक अडचणी जाणवत होत्या. बंगोडारा या ठिकाणी ते भाडे तत्त्वावर असलेल्या घरात राहात होते. विपुल वाघेला रिक्षा चालक होते आणि त्यांच्या घरात कमाई करणारे ते एकटेच होते. एका नातेवाईकाने सांगितलं की विपुलने कर्ज काढून रिक्षा विकत घेतली होती. मात्र त्याचे हप्ते भरताना त्याला नाकी नाऊ येत होते. आर्थिक अडचणी भासत असल्याने विपुल आणि त्याची पत्नी कायमच तणावात असायचे. बहुदा याच कारणामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं.
पोलीस अधिकारी वागिशा जोशी काय म्हणाल्या?
वरिष्ठ पोलीस अधिकारी वागिशा जोशी म्हणाल्या की त्यांना रात्री उशिरा या घटनेची माहिती फोनवरुन मिळाली. आम्ही सगळे जेव्हा तिथे पोहचलो तेव्हा आम्हाला पाच जणांचे मृतदेह आढळले. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसंच शवविच्छेदनासाठी हे मृतदेह पाठवण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे हे घडल्याचं बोललं जातं आहे मात्र या घटनेचे सगळे पैलू आम्ही तपासून पाहतो आहोत.