पीटीआय, नवी दिल्ली

ऐतिहासिक लाल किल्ल्याचा सदैव गजबजलेला परिसर सोमवारी सायंकाळी एका कारमध्ये झालेल्या स्फोटाने हादरून गेला. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या सिग्नलजवळ झालेल्या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी आहेत. जम्मू-काश्मीरमधील मोहिमेतून घातपाताचा मोठा कट उधळून लावल्याचा दावा तीन राज्यांचे पोलीस करत असताना झालेला हा स्फोट दहशतवादी कृत्य आहे की नाही, याबाबत केंद्र सरकार किंवा तपास यंत्रणांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, १४ वर्षांनंतर दिल्लीत घडलेल्या स्फोटाच्या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे. मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांत या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी रात्री घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) तपासाचे आदेश दिले. एनआयएसह, न्यायवैद्याक प्रयोगशाळा, ‘एनएसजी’, उत्तर प्रदेश ‘एटीएस’ अशा विविध यंत्रणांनी  घटनास्थळी तपासकार्य सुरू केले आहे.

दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६.५२च्या सुमारास ‘ह्युदाइ आय ट्वेंटी’ कारमध्ये हा स्फोट झाला. त्यावेळी कारमध्ये तीनजण बसले होते आणि कार संथपणे सरकत होती. कारमधील स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी, मृत किंवा जखमींपैकी कुणाच्याही शरीरा छर्रे किंवा तत्सम तीक्ष्ण वस्तू शिरल्याचे आढळले नाही. बॉम्बस्फोटानंतर घटनास्थळ मोठा खड्डा पडतो. तसेही याठिकाणी घडलेले नाही. त्यामुळे बॉम्बस्फोटाबद्दल पोलिसांनी साशंकता व्यक्त केली. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, संबंधित कारची नोंदणी नावावर असलेल्या व्यक्तीस हरयाणातून अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मृतांचा आकडा वाढणार?

दुर्घटनेतील जखमींना नजीकच्या एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोन-तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊन स्फोटात जखमी झालेल्यांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.

महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा, सुरक्षेत वाढ

दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुंबईत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अप्रिय घटना टाळण्यासाठी जिल्हा पोलीस- प्रमुख आणि शहरांचे पोलीस आयुक्त यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पंतप्रधानांकडून आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत बळी गेलेल्यांप्रती शोक व्यक्त केला. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून केली. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.