Jammu and Kashmir Chositi Cloudburst : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील एक दुर्गम गावात झालेल्या ढगफुटीच्या घटनेत आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत जवळपास १०० जण जखमी झाले आहेत. या भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेबद्दल प्राथमिक माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले होते की, चशोटी भागात ढगफुटी झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले, की प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले असून बचाव पथके घटनास्थळाकडे रवाना झाली आहेत. या घटनेनंतर नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी किश्तवाडचे डीसी पंकज कुमार शर्मा यांच्याशी, तसेच त्यांनी स्थानिक आमदार आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते सुनील कुमार शर्मा यांच्याशी देखील याबद्दल चर्चा केल्याचे सांगितले होते.

मचैल यात्रेदरम्यान ढगफुटी

किश्तवाडमधील चाशोटी भागात अचानक पूर आला, येथून माचैल माता यात्रेला सुरूवात होते. बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले . दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ढगफुटीची घटना ही मचैल माता तीर्थयात्रेदरम्यान झाली आहे. येथे आल्यानंतर भाविक हे त्यांची वाहने येथे पार्क करतात आणि यानंतर २,८०० मीटर उंचीवर असलेल्या मचैल माता मंदिरापर्यंत चालत जातात. या मार्गावर ही ढगफुटी झाली.

गृहमंत्र्यांनी घेतला आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ते स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. “किश्तवाड जिल्ह्यातील ढगफुटीबाबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे. एनडीआरएफ पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली आहेत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि प्रत्येक परिस्थितीत जम्मू-काश्मीरच्या जनतेसोबत ठामपणे उभे आहोत,” अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

राष्ट्रपती मुर्मूंनी व्यक्त केल्या संवेदना

“जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटीच्या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. मी शोकाकूल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करते आणि त्यांना मदत आणि बचाव कार्यात यश मिळावे अशी प्रार्थना करते,” अशी पोस्ट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी एक्सवर केली आहे.

जम्मू-काश्मीरचे विरोधीपक्ष नेते आणि पद्दर-नागसेनीचे आमदार सुनील कुमार शर्मा म्हणाले की, आमच्याकडे अद्याप कोणतीही संख्या किंवा डेटा नाही मात्र मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे…. यात्र सुरू झाल्याने हा परिसर गर्दीचा आहे. मी उपराज्यपालांशी चर्चा करेन आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथकांची मागणी करेल.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. यासह सिव्हील, पोलीस, लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्याला मदत करण्याचे आणि पीडितांना शक्य ती सर्व मदत देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.