गुरुदास कामत सरचिटणीस, महाराष्ट्र मोहन प्रकाशांकडेच
अखिल भारतीय काँग्रेसमध्ये रविवारी व्यापक संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. सोनिया गांधी यांनी आपल्या अध्यक्षतेखाली १२ राष्ट्रीय सरचिटणीसांसह सर्वोच्च ठरलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत २१ सदस्यांची नियुक्ती केली असून ४२ सचिवांच्या नावांचीही घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्यासह केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणारे अजय माकन आणि डॉ. सी. पी. जोशी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांना सरचिटणीसपदी बढती देण्यात आली आहे. विलास मुत्तेमवार यांना सरचिटणीसपदावरून हटवून राष्ट्रीय कार्यकारिणीत कायम निमंत्रितांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
अंबिका सोनीयांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कार्यालयाच्या जबाबदारीसह पक्ष संघटनेत पुनरागमन केले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्याकडून तेलंगणमुळे धगधगणाऱ्या आंध्र प्रदेशचा प्रभार काढून तो दिग्विजय सिंह यांच्याकडे देण्यात आला आहे. काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे नामकरण संपर्क विभाग असे करण्यात आले असून त्याची जबाबदारी अजय माकन यांच्यावर टाकण्यात आली आहे.
* केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज खांदेपालट : पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी खांदेपालट होणार आहे. अश्वनीकुमार, पवनकुमार बन्सल, अजय माकन, डॉ. सी. पी. जोशी या कॅबिनेट मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर उद्या कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल.
फेरबदलात विधी व न्याय, रेल्वे, रस्ते व महामार्ग, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान, गृहनिर्माण आणि शहरी दारीद्र्य निर्मूलन अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी कोणाकडे सोपविली जाते, याकडे लक्ष लागलेले आहे. बन्सल आणि अश्वनीकुमार यांना भ्रष्टाचार आणि सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याबद्दल मंत्रीपद सोडावे लागले होते. अजय माकन आणि सी. पी. जोशी यांनी पक्षात काम करण्यासाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.