मथुरा : मथुरेतील कृष्णजन्मभूमीवरील मशिदीत ६ डिसेंबरला भगवान कृष्णाची मूर्ती बसवण्याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या तयारीची चाचपणी करण्यासाठी शहर पोलिसांनी दंगल प्रतिबंधक कवायत (अँटी- रायट ड्रिल) पार पाडली. वरील योजना आखणाऱ्या गटाने गेल्या आठवडय़ात हे आवाहन मागे घेतले असले, तरी पोलीस कुठलीही जोखीम घेण्यास तयार नाहीत.

ही कवायत शनिवारी पोलीस लाइन्स भागात झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव ग्रोव्हर यांनी दिली. जिल्हा दंडाधिकारी नवनीत सिंग चहल यांच्या उपस्थितीत शस्त्रांची चाचणीही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शाही ईदगाह मशिदीत मूर्ती बसवण्याची घोषणा हिंदुत्ववादी संघटनांनी केल्यानंतर पोलिसांनी यापूर्वी शहरातील सुरक्षा वाढवली होती.

औरंगजेबाच्या काळातील शहरातील या मशिदीच्या शेजारीच केशवदेव मंदिर आहे. पोलिसांनी कलम १४४ लागू केले असून लोकांना मोठय़ा संख्येत एकत्र येण्यास बंदी घातली आहे.

सीमांची नाकाबंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी सायंकाळपासून शहराच्या सीमांवर झडतीसह इतर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात येत असल्याचे शहर पोलीस अधीक्षक मरतड प्रकाश सिंह यांनी सांगितले. रविवारी सकाळपासून निरनिराळ्या ठिकाणी निमलष्करी दलेही तैनात करण्यात आली असून, मंगळवापर्यंत वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.