पॅरालम्पिकमधील कामगिरीबद्दल दिव्यांग खेळाडूंचे कौतुक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मायावतींनी निशाणा साधला आहे. विकासाचा अजंडा घेऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आतापर्यंत काय विक्रम नोंदविले याचे मोदींनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी दिला आहे.
‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये पॅरालम्पिक खेळाडूंचे कौतुक करताना सर्वसामान्य ऑलिम्पिकचे रेकॉर्ड मोडणाऱ्या दिव्यांग खेळाडूंच्या कामगिरीमुळे त्यांच्याकडे पहाण्याची मानसिकता बदलली आहे, असे नरेंद्र मोदींनी रविवारी म्हटले होते. दिव्यांग खेळाडूंच्या रेकॉर्डच्या संदर्भातील हा धागा पकडत मोदींनी आपल्या सरकारने सत्तेत आल्यापासून आतापर्यंत काय केले, याचे परीक्षण करावे, असा सल्ला मायावतींनी दिला आहे. आपल्या भाषणामध्ये  विकासाचे गोडवे गाणाऱ्या मोदींनी स देशात विकासाकडे प्रामाणिकपणे लक्ष द्यावे, असेही मायावती यावेळी म्हणाल्या.
उत्तर प्रदेशमधील आगामी विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर मायावती वेळोवेळी मोदी सरकारवर तोफ डागत आहेत. यापूर्वी त्यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोदी सरकार आपल्याच पोकळ कार्यक्रमांचा उदोउदो करीत असल्याचे म्हटले होते. या धोरणामुळे भाजप सरकारचे वाईट दिवस येत आहेत असेही त्यांनी म्हटले होते. तसेच सरकारचे अपयश झाकून जनतेचे लक्ष वळविण्याठी मोदी सरकार पाकिस्तानशी दहशतवादाच्या मुद्दय़ावर युद्ध करेल, असा दावा देखील काही दिवसांपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayawati comment on bjp govt
First published on: 25-09-2016 at 15:45 IST