जगप्रसिद्ध अशा मॅकडोनल्ड्स या फास्टफूड कंपनीविरोधात एका स्टार्टअप कंपनीने ९०० दशलक्ष डॉलर्सचा (अंदाजे सहा हजार ८७८ कोटींचा) दावा केलाय. या कंपनीने त्यांनी तयार केलेला आइस्क्रीम मशिनच्या डिझाइनचा वापर न सांगता केल्याचा आरोप मॅकडोनल्ड्सवर केलाय.
एक मार्च रोजी किच याच स्टार्टअप कंपनीने हा दावा केलाय. समोर आलेल्या माहितीनुसार मॅकडोनल्ड्स कंपनीने किच कंपनीला पाठवलेल्या ईमेलमध्ये त्यांच्या मशिन्स या सदोष असून वॉरंटीसंदर्भातील नियमांचं उल्लंघन करत आहेत असं सांगितलं होतं. तसेच मॅकडोनल्ड्सने किचसंदर्भातील गुप्त माहिती उघड केल्याचा दावा स्टार्टअप कंपनीने केलाय.
किचने पुरवलेल्या मशिन्स या सदोष असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना इजा होऊ शकते असंही मॅकडोनल्ड्सने म्हटल्याचा उल्लेख याचिकेत आहे. किच ही कंपनी आइस्क्रीमसंदर्भातील यंत्रसामुग्री मॅकडोनल्ड्सला पुरवते. यामध्ये रिमोट कंट्रोल, देखभाल आणि आइस्क्रीमसंदर्भातील इतर उपकरणांची सेवा पुरवण्याचा समावेश आहे. या कंपनीने आता मॅकडोनल्ड्सने केलेले सदोष यंत्रणांसंदर्भातील दावे खोटे असल्याचं म्हणत मॅकडोनल्ड्सविरोधात दवा दाखल केलाय. टेलर कंपनीच्या माध्यमातून किचने हा दावा केलाय. टेलर ही आईस्क्रीमसंदर्भातील यंत्रसामुग्री पुरवणारी किचचे उपकंपनी आहे.
किचचे संस्थापक मिलिसा नेल्सन आणि जेरमी ओल्सोव्हॅन यांनी ९०० दशलक्ष डॉलर्सचा दावा केला असून मानहानीचाही खटला दाखल केलाय. मॅकडोनल्ड्स चुकीचे आरोप करण्याबरोबरच जाहिरातही चुकीच्या पद्धतीने करत दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या कराराचं उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आलाय.
यासंदर्भात इनसायडरला मॅकडोनल्ड्सने पाठवलेल्या ईमेलमध्ये कर्मचारी, ग्राहक आणि सर्वांची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्वाची असल्याचं कंपनीने म्हटलंयच किचचे दावे चुकीचे असून आम्ही या अर्जाला योग्य ते उत्तर देऊ असं मॅकडोनल्ड्स स्पष्ट केलंय.