Muskan Rastogi मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे. सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने निर्घृण खून केला. सौरभ आणि मुस्कानला सहा वर्षांची मुलगी आहे. सौरभ चांगल्या नोकरीला असून त्याची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे. तरीही मुस्कानने व्यसनी साहिलसाठी स्वतःच्या पतीला संपवले. ४ मार्च रोजी सौरभचा खून केल्यानंतर मुस्कान आणि साहिल हिमाचल प्रदेशमध्ये थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेले होते. आता हीच मुस्कान रस्तोगी गरोदर आहे अशी माहिती समोर आली आहे.

मुस्कान रस्तोगी गरोदर

सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मेरठच्या तुरुंगात असलेली मुस्कान रस्तोगी गरोदर असल्याची बातमी समोर आली आहे. तिचा प्रेग्नंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत माहिती मिळताच सौरभच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. सौरभचा भाऊ बबलू याने या बाबत असं म्हटलं आहे की जर मुस्कानच्या पोटात वाढणारं मूल सौरभचं असेल तर आम्ही त्याला स्वीकारु. तसंच या मुलाची डीएनए टेस्ट केली जावी त्यामुळे हे कळेल की हे मूल सौरभचं आहे की साहिल शुक्लाचं अशीही मागणी बबलूने केली आहे.

गेल्या आठवड्यात मुस्कानची चाचणी

मुस्कान आणि सौरभ यांना ६ वर्षांची मुलगी आहे. सौरभच्या कुटुंबाने मुलीला आमच्याकडे सोपवा अशी मागणी केली आहे. दरम्यान मुस्कान गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. मागील सोमवारी जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरांचं पथक तुरुंगात पोहचलं होतं या पथकाने मुस्कानची वैद्यकीय तपासणी केली होती. त्यानंतर तिच्या प्रेग्नंसीचा अहवाल सकारात्मक आला आहे.

सौरभ राजपूत हत्या प्रकरण काय आहे?

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मार्च महिन्यात एक घटना घडली. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी सौरभ राजपूतची हत्या झाल्याची घटना घडली. मुस्कान रस्तोगी या महिलेने तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बरोबर घेऊन पती सौरभ राजपूतची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून एका ड्रममध्ये भरून वरून काँक्रिट ओतून बंद केलं होतं. एवढंच नाही तर पतीची हत्या केल्यानंतर पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे दोघे हिमाचल प्रदेशला फिरायला गेले होते. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला अटक केलं असून ते आता तुरुंगात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुस्कान आणि साहिल यांना अंमली पदार्थांचं व्यसन

सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक करण्यात आली असून त्यांना गंभीररित्या अंमली पदार्थांचं व्यसन असल्याचं समोर आलं आहे. ते तुरुंगातही अंमली पदार्थांची मागणी करत असून तुरुंगातील जेवण नाकारत असल्याची बातमीही समोर आली होती. आता या पाठोपाठ मुस्कान गरोदर असल्याची बातमी समोर आली आहे.