पश्चिम अफ्रिकेच्या किनारपट्टीवरचे तेल टँकर असलेले जहाज गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजावर २२ भारतीय नागरिक आहेत अशीही माहिती पुढे आली आहे. गल्फ ऑफ गिनी या ठिकाणाहून हे जहाज गायब झाले आहे. गुरुवारी सकाळी ५.३० वाजल्यापासून या जहाजाशी कोणताही संपर्क झालेला नाही त्यामुळे या जहाजाचे अपहरण झाले असावे अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.

गायब झालेले जहाज मुंबईतील अँग्लो ईस्टर्न शिपिंग कंपनीच्या मालकीचे आहे अशीही माहिती समोर येते आहे. या कंपनीने जहाजाचा शोध घेण्यासाठी शिपिंग डायरेक्टरेट जनरल यांची मदत मागितल्याचे समजते आहे. हे एक व्यापारी जहाज आहे. या जहाजाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे.

 

जानेवारी महिन्यातही एमटी बँरेट नावाच्या जहाजाचे बेनिनच्या किनाऱ्यावरून अपहरण करण्यात आले होते. त्यातही अनेक भारतीय खलाशी होते. ते जहाज समुद्री चाच्यांनी पळवले होते. त्यांना खंडणी दिल्यावर ते जहाज परत सापडले होते. आताही या जहाजावर सुमारे २२ खलाशी आहे ज्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

नायजेरियन आणि बेनिन येथील अधिकाऱ्यांनी हे जहाज शोधण्यासाठी सहकार्य करावे असेही या कंपनीने म्हटले आहे. या जहाजात तेलाने भरलेले टँकर आहेत अशी माहिती ‘एएनआय’ने दिली आहे. गायब झालेले जहाज पश्चिम अफ्रिकेतील समुद्री चाच्यांनी पळवले असावे अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. ही शक्यता लक्षात घेऊन तपास करण्यात येतो आहे.