Microsoft to Buy Human Waste : जगातील मोठी टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने अलीकडेच तब्बल १४ हजार कोटी रुपये खर्च करून मानवी विष्ठा खरेदी केली आहे. ही बातमी वाचून तुम्हाला विचित्र वाटलं असेल, मात्र हे खरं आहे की कंपनीने एका महत्त्वाच्या कामासाठी हे पाउल उचललं आहे. यासाठी मायक्रोसॉफ्टने १.७ अब्ज डॉलर्सचा (१४,००० कोटी रुपये) करार देखील केला आहे. या करारांतर्गत कंपनी मानवी विष्ठा (मल), शेतातील शेणखत, जैविक कचरा खरेदी करणार आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सेंटरमधून होणाऱ्या प्रदूषणावरील उतारा (प्रदूषणामुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी) म्हणून एक नवा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठीच कंपनीने मल, शेणखत व जैविक कचरा खरेदीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने अमेरिकेतील व्हॉल्टेड डीप (Vaulted Deep) कंपनीशी १२ वर्षांचा करार केला आहे. या करारांतर्गतर कंपनी वातावरणातील तब्बल ४९ लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड कमी करण्यासाठी काम करणार आहे. त्यासाठी हा जैविक कचरा जमिनीखाली ५,००० फूट खोल टाकला जाईल. जेणेकरून तो कचरा परत वातावरणात येणार नाही.

चार वर्षांत मायक्रोसॉफ्टकडून ७.५५ कोटी टन कार्बनचं उत्सर्जन

कंपनीसाठी हा करार खूप महत्त्वाचा आहे. कंपनी त्यांच्या एआय प्लान्टमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर करणार आहे. परिणामी या प्लान्टमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होईल. त्यामुळेच उत्सर्जित झालेला कार्बन नष्ट करण्यासाठी कंपनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवणार आहे. मायक्रोसॉफ्टने २०२० ते २०२४ या काळात तब्बल ७५.५ दशलक्ष टन (७.५५ कोटी टन) कार्बन उत्सर्जित केला आहे. आता एआयच्या वापरामुळे हे प्रमाण वाढलं आहे. उत्सर्जित केलेल्या कार्बनची विल्हेवाट लावणं ही कंपनीचीच जबाबदारी आहे. त्यामुळे कंपनी नवा प्रकल्प हाती घेत आहे.

मायक्रोसॉफ्टची भविष्यासाठी गुंतवणूक

वातावरणातील एक टन कार्बनची विल्हेवाट लावण्यासाठी (काढून टाकण्यासाठी) तब्बल ३५० डॉलर्स (२९,००० रुपये) खर्च येतो.अशा स्थितीत कंपनीचा ‘कचऱ्यापासून कार्बन नियंत्रण’ करण्यासाठीचा करार तंत्रज्ञानाच्या जगातील सर्वात मोठ्या गुंतवणुकाीपैकी एक मानला जात असल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटलं आहे.

व्हॉल्टेड डीप ही कंपनी bioslurry नावाचं सेंद्रिय सांडपाणी गोळा करते. गटार, शेत व कागद तयार करणाऱ्या कारखान्यांमधून हे पाणी जमा केलं जातं. हे सगळं सांडपाणी एकत्र करून विशिष्ट पंपाच्या सहाय्याने ५,००० फूट जमिनीत खोलवर इंजेक्ट केलं जातं. हे सांडपाणी व कचरा जमिनीवर राहिल्यास तो सडतो आणि मीथेनसारखे वायू उत्सर्जित करतो. मीथेन हा कार्बन डायऑक्साइडपेक्षा चार पट अधिक तापमान वाढवणारा वायू आहे. त्यामुळे त्याचं नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी इतका मोठा खर्च

याबाबत कंपनीचे सीईओ रायकलस्टीन यांनी Inc. मासिकाला सांगितलं की कचऱ्याची विल्हेवाट लावणं आमचं प्रमुख काम आहे. जमिनीवर राहून पर्यावरणाची हानी करणारा कचरा व सांडपाण्याची आम्ही विल्हेवाट लावतो. आम्ही हा कचरा जमिनीत खूप खोलवर टाकतो. जेणेकरून तो कायमचा बंदिस्त राहील आणि कार्बन स्वरुपात उत्सर्जित होणार नाही.