माध्यान्ह भोजन योजनेतील आहारामुळे बिहारमध्ये अनेक मुले मृत्युमुखी पडल्याने सरकारवर टीकेची झोड उठली असतानाच आता या योजनेतील सूचना शाळेच्या मुख्याध्यापकांना छापील स्वरूपात द्याव्यात व शाळेच्या भिंतीवरही हे निकष लिहिले जावेत असे आदेश काढण्यात आले आहेत.
बिहारच्या माध्यान्ह भोजन योजनेचे संचालक आर.लक्ष्मणन यांनी सांगितले की, माध्यान्ह आहार योजनेचा दर्जा व सुरक्षा याविषयीच्या सविस्तर सूचना दिल्या जातील. अन्न तज्ज्ञांच्या सल्ल्याने या सूचना तयार केल्या जात असून बिहारमधील सारण जिल्ह्य़ातील धर्मसती गंडामन प्राथमिक शाळेत घडली तशी घटना घडल्यास काय काळजी घेण्यात यावी व कुठले प्रथमोपचार करावेत हे सूचित केले जाणार
आहे.
अन्न दुर्घटनेच्यावेळी मुलांना ‘ओआरएस’ म्हणजे जलसंजीवनी दिली पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मुख्याध्यापकांना अशावेळी करावयाच्या उपाययोजना माहित असल्या पाहिजेत, त्यामुळे आता अधिक स्पष्ट स्वरूपात ही माहिती त्यांना दिली जाईल असे ते म्हणाले.
सारण जिल्ह्य़ातील दुर्घटनेनंतर अन्नाचा दर्जा व सुरक्षा यांचा फेरविचार केला जात आहे असे सांगून ते म्हणाले की, आता दररोज रोजचे भोजन कुणी तयार केले, विद्यार्थ्यांना देण्यापूर्वी ते कुणी खाऊन पाहिले याची नोंद करावी लागणार आहे. अधिकारी या नोंदवह्य़ा वेळोवेळी शाळात जाऊन तपासणार आहेत. दरम्यान, बिहारमधील माध्यान्ह भोजन विषबाधा प्रकरणास सहा दिवस उलटले तरी या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या शाळा मुख्याध्यापिका आणि तिचा पती अद्यापही फरारीच आहे. त्यामुळे आता त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यादृष्टीने ते सोमवारी न्यायालयाकडे याचिका दाखल करणार आहेत.