पीटीआय, काठमांडू : अग्रगण्य भारतीय महिला गिर्यारोहक बलजीत कौर मंगळवारी जिवंत सापडली. नेपाळमधील अन्नपूर्णा शिखरावरून खाली उतरत असताना अन्नपूर्णा चार क्रमांकाच्या शिबिराजवळ सोमवारी बेपत्ता झाली होती. मात्र, सुदैवाने एका दिवसानंतर, ही २७ वर्षीय गिर्यारोहक जिवंत सापडल्याचे या मोहिमेच्या आयोजक अधिकाऱ्याने सांगितले.

‘पायोनियर अ‍ॅडव्हेंचर’चे अध्यक्ष पासांग शेर्पा यांनी सोमवारी ‘हिमालयन टाइम्स’ वृत्तपत्रास माहिती देताना सांगितले, की पूरक प्राणवायूचा वापर न करता, जगातील दहावे सर्वोच्च शिखर बलजीत कौरने सर केले. मात्र, उतरताना त्या चौथ्या शिबिराजवळ बेपत्ता झाल्या होत्या. हवाई शोध पथकाने या शिबिराच्या वर कौर यांना शोधले. त्या चार क्रमांकाच्या शिबिराकडे एकटय़ाच निघाल्या होत्या. त्या या शिखरावर एकटय़ा उरल्या होत्या व त्यांच्याशी रेडिओ संपर्क मंगळवार सकाळपर्यंत होऊ शकत नव्हता. मंगळवारी सकाळी बलजीतने तातडीने मदतीचा रेडिओ संदेश पाठवल्यानंतर हवाई शोध मोहिमेस सुरुवात झाली. शेर्पा यांनी सांगितले, की आम्ही बलजीतला या उंचीवरील शिबिरातून हवाईमार्गे खाली आणणार आहोत.