नौदलाची ‘आयएनएस सिंधुरत्न’ पाणबुडी अपघातग्रस्त झाल्यापासून बेपत्ता झालेल्या दोन अधिकाऱयांचा मृत्यू झाल्याचे नौदलातर्फे गुरुवारी सांगण्यात आले. लेफ्टनंट कमांडर कपिश मुवल आणि लेफ्टनंट मनोरंजन कुमार या दोन अधिकाऱयांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. नौदलातर्फे बुधवारपासून या दोघांचा शोध घेण्यात येत होता.
अपघातग्रस्त भागात अडकल्यामुळे या दोन्ही अधिकाऱयांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते आहे. मुंबईपासून सुमारे ५० सागरी मैल अंतरावर बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास सिंधुरत्न पाणबुडीतून अचानक धूर येऊ लागला. धुरामुळे सात जण जखमी झाले होते आणि दोघे जण बेपत्ता होते. त्याच दोघांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.
रशिनय बनावटीच्या किलो वर्गातील या अपघातग्रस्त पाणबुडीला गुरुवारी सकाळी मुंबईमध्ये नौदलाच्या तळावर आणण्यात आले असून, घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.