आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रचारप्रमुख करण्याचा मुद्दा भाजपमध्ये ज्वलंत ठरला आहे. दिल्ली येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या घरासमोर मोदीसमर्थकांनी शनिवारी उग्र निदर्शने करून अडवाणींविरोधात बंडाचा झेंडा उभारला. राजकीय वर्तुळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून ‘अडवाणी गट’ आणि ‘मोदी गट’ यांच्यात उघड संघर्ष निर्माण झाला आहे.
लालकृष्ण अडवाणी शनिवारीही ‘आजारपणाची’ सबब देत पणजी येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस अनुपस्थित राहिले. दरम्यान, ‘नमोनिया’मुळे आपण गोव्यात सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला गैरहजर राहिलो नाही, असे तिरकसपणे सांगत पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनीही नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर जाग्या झालेल्या भाजपने ‘निदर्शने करणारे लोक आमचे नसून या लोकांना भाजपशी काहीही देणेघेणे नाही’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करून नेहमीप्रमाणे विश्वामित्री पवित्रा घेतला आहे.
सिन्हा यांचे प्रतिपादन
‘नमोनिया’मुळे आपण गोव्यात सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला गैरहजर राहिलेलो नाही तर अन्य कारणेही त्यामागे होती, असे स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी दिले. आपल्याला ‘नमोनिया’ झालेला नाही, आपली प्रकृती ठणठणीत आहे. परंतु गोव्याला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हजर न राहण्यामागे अन्य कारणे आहेत आणि त्यामुळेच आपण तेथे गेलो नाही, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंग हेही गोव्यातील बैठकीला गैरहजर राहिले असून त्यांच्या गटाच्या संदर्भात ‘नमोनिया’ हा शब्दप्रयोग प्रचलित करण्यात आला आहे.
राजकीय स्तरावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर जाग्या झालेल्या भाजपने ‘निदर्शने करणारे लोक आमचे नसून या लोकांचा भाजपशी काहीही देणेघेणे नाही’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करून विश्वामित्री पवित्रा घेतला आहे. अडवाणी यांच्या घरासमोर झालेल्या निदर्शनांप्रकरणी संभाव्य परिणामांची तीव्रता ध्यानी आल्यानंतर पणजी येथे आलेल्या प्रवक्त्यांनी या घटनेचा निषेध करून एकूणच प्रकरणावर रंगसफेती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यामुळेच ‘अडवाणीजी हे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते असून निदर्शने करणाऱ्यांना पक्षाशी काहीही देणेघेणे नाही’, असे प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
नंतर पत्रकारांसमवेत वार्तालाप करताना अन्य प्रवक्त्या निर्मला सीतारामन् यांनीही या घटनेचा निषेध केला. आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या घरासमोर भाजपने निदर्शने केली नाहीत, असे त्या म्हणाल्या. अडवाणी यांच्या घरासमोर निदर्शने करणाऱ्या व्यक्तींचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे सीतारामन् यांनी स्पष्ट केले. हे निदर्शक भाजपचे नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
मोदी यांच्या नावाची घोषणा करण्याबाबत संभ्रम
लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्याबाबत भाजपच्या नेते द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत. लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अन्य नेत्यांनी गोव्यातील अधिवेशनाकडे पाठ फिरविल्याने पक्षापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अडवाणी आणि अन्य नेत्यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांची चांगलीच त्रेधा उडाल्याचे दिसत होते. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची रविवारी सांगता होणार असून, तोपर्यंत मोदी यांच्याबाबतचा निर्णय होईल का, असे विचारले असता जावडेकर म्हणाले की, उच्चपदस्थ नेत्यांमध्ये एकमत झाल्याशिवाय भाजपमध्ये कोणताही निर्णय होत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2013 रोजी प्रकाशित
अडवाणी विरुद्ध मोदी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रचारप्रमुख करण्याचा मुद्दा भाजपमध्ये ज्वलंत ठरला आहे. दिल्ली येथे पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या घरासमोर मोदीसमर्थकांनी शनिवारी उग्र निदर्शने करून अडवाणींविरोधात बंडाचा झेंडा उभारला.
First published on: 09-06-2013 at 05:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi against advani