भाजपच्या नेत्यांकडून एखाद्या गोष्टीबद्दल केला जाणारा अतिआक्रमक आणि विखारी प्रचार हा नेहमीच विरोधकांच्या टीकेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा काँग्रेसमुक्त भारत हा नारा राजकीय वर्तुळात अशाच टीकेचा विषय ठरला. भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या विरोधकांना कायमचे संपवण्याची भाषा कधीच केली नव्हती, असा युक्तिवाद करत विरोधकांनी काँग्रेसची अनेकदा कोंडी केली. या टीकेला गुरूवारी हिमाचल प्रदेशातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विधानाचा दाखला दिला. पंडित नेहरू हेदेखील सुरूवातीच्या काळात भारताला जनसंघ मुक्त करू, असे म्हणायचे, याची आठवण मोदींनी करून दिली. तसेच सध्याचा काँग्रेस पक्षात महात्मा गांधींजी आणि स्वातंत्र्यसैनिकांना अभिप्रेत असलेली एकही गोष्ट उरलेली नाही. आताच्या काँग्रेसमध्ये केवळ भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण, जातीयवाद आहे. हा पक्ष कीड लागलेल्या विचारसरणीचे उदाहरण आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देतो, तेव्हा आम्हाला या कीड लागलेल्या विचारणीपासून देशाला मुक्ती मिळावी, असे अभिप्रेत असल्याचे मोदींनी सांगितले.
‘काँग्रेसमुक्त भारत’चा चुकीचा अर्थ काढला जातोय- अमित शहा
या सभेत मोदींनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्यावरही टीकास्त्र सोडले. काँग्रेसची अवस्था ही एखाद्या लाफिंग क्लबसारखी झाली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. असे असतानाही पक्षाच्या जाहीरनाम्यात शून्य भ्रष्टाचाराचे आश्वासन दिले जाते, हा मुद्दा मोदींनी अधोरेखित केला. तसेच आगामी निवडणुकीत भाजप विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.