“पंतप्रधान मोदी हे काही भारताचे राजे नाहीत”, हे शब्द विरोधी पक्षाच्या नेत्यांचे नाहीत तर भाजपाच्या एका खासदाराचे आहेत. विशेष म्हणजे तुम्ही मोदीविरोधी आहात असं म्हटल्यानंतर एका भाजपा समर्थकालाच या शब्दांमध्ये थेट ट्विटरसारख्या सार्वजनिक माध्यमातून हे खडे बोल या खासदाराने सुनावले आहेत. इतकच नाही तर मी मोदी सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांसंदर्भात कुठेही कोणाशीही चर्चा करायला तयार असल्याचं थेट चँलेंजही या भाजपा खासदाराने दिलंय. या खासदाराचं नाव आहे सुब्रह्मण्यम स्वामी.

झालं असं की स्वामी यांनी अफगाणिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींचे विश्वासू सहकारी म्हणजेच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर अफगाणिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर टीका केली. “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला अडचणीत आणणारे जयशंकर आणि डोवाल हे दोघे कधीतरी देशाची माफी मागतील का? मोदी समवयस्क राजकारण्यांवर विश्वास न ठेवता अशा राजकारण्यांवर विश्वास ठेवत असल्याने त्यांना मुक्तपणे निर्णय घेण्याची सूट देण्यात आलेली. आता आपण (त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे) आपल्या सर्व शेजारी देशांसोबतचे संबंध बिघडवून बसलोय,” असा टोला स्वामींनी लगावला.

नक्की वाचा >> अफगाणिस्तान संघर्ष : भारताला मित्र मानता की शत्रू?; तालिबानने स्पष्ट केली भूमिका

यावर एकाने रिप्लाय करुन स्वामींना मोदी विरोधी म्हटलं. “मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुम्ही मोदी आणि सरकारने काही चुकीचे निर्णय घेतल्यावर जी टीका करता त्यासाठी मी तुम्हाला पाठिंबा देत राहील. मात्र आता तुमचे प्रत्येक ट्विट त्यांच्याविरोधात असते. हे असं वाटतंय की तुम्ही मोदीविरोधी झाला आहात कारण त्यांनी तुम्हाला तुमचं आवडतं मंत्रालय दिलं नाही,” असं या चाहत्याने म्हटलं. स्वामी यांना अर्थमंत्रालयामध्ये रस होता अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये फार काळापासून सुरु असून याच दिशेने या चाहत्याचा रोख होता.

मात्र मोदीविरोधी हे शब्द ऐकून स्वामी चांगलेच संतापले आणि त्यांनी थेट मोदी हे काही देशाचे राजे नाहीत अशा शब्दांमध्ये आपला संताप व्यक्त केला. “मोदी सरकारच्या आर्थिक आणि पराष्ट्र धोरणांच्या मी विरोधात आहे. मी यासंदर्भात कोणाशीही चर्चा करायला तयार आहे. तुम्ही कधी पार्टीसीपेटरी डेमोक्रसीबद्दल ऐकलं आहे का? मोदी काही भारताचे राजे नाहीत,” असा टोला स्वामींनी ट्विटरवरुन लगावला.


भारताला धमकीवजा इशारा…

दरम्यान, कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरे ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेच्या मुलाखतीमध्ये तालिबानचा कतारमधील दोहा येथील कार्यालयातील प्रवक्ता मोहम्मद सोहिल साहीनने भारतालाही धमकावले आहे. भारताने अफगाणिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करु नये असा इशाराच तालिबानने दिला आहे. “जर ते अफगाणिस्तान लष्कराच्या मदतीला आले किंवा त्यांनी इथे आपली उपस्थिती दाखवली तर त्यांच्यासाठी (भारतासाठी) हे चांगलं ठरणार नाही. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये इतर देशांनी सैन्य पाठवलं तेव्हा काय घडलं हे पाहिलं आहे. हे सर्व प्रकरण त्यांच्यासाठी एखाद्या खुल्या पुस्तकाइतकं स्पष्ट आहे,” असं साहीन म्हणाला आहे.

पुढे बोलताना साहीनने भारताने अफगाणिस्तानला केलेल्या मदतीसंदर्भात भाष्य केलं आहे. “त्यांनी (भारताने) अफगाणिस्तानमधील लोकांना आणि देशातील राष्ट्रीय प्रकल्पांना मदत केली आहे. त्यांनी यापूर्वीही मदत केलीय. त्याचं आम्हाला कौतुक आहे,” असंही साहीनने तालिबानची भूमिका मांडताना म्हटलं आहे.

दहशतवाद्यांना मदत करणार…

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यास आमच्या देशामधून आम्ही आयएसआयएस आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांना काम करण्यास परवानगी देऊ, असंही तालिबानने स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याचा दावा प्रवक्त्याने फेटाळून लावला. “तुम्ही म्हणता आम्हाला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. मात्र माझ्यामते तुम्ही असं म्हणत आहात कारण तुमचे पाकिस्तानशी वैर आहे. तुम्ही हा दावा अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहून केलेला नाहीय,” असं प्रवक्त्यांनी सांगितलं.

तालिबानची विचारसरणी काय?

१९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवणाऱ्या तालिबानला अमेरिकेने जवळजवळ संपवलं होतं. इस्लामिक कायद्यानुसार तालिबान कारभार करतं. यामध्ये महिलांना कामाची तसेच शिक्षणाची परवानगी नसते. पुरुष नातेवाईक सोबत असेपर्यंत महिला एकटी घराबाहेर पडू शकत नाही. पुरुषांनी दाढी वाढवून डोक्यावर गोलाकार टोपी घालणं बंधनकारक असतं. मनोरंजनाची साधने वापरण्यावर बंदी असते. याचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा केली जाते. अमेरिकेने दणका दिल्यानंतर तालिबान्यांनी पाकिस्तानचा आश्रय घेतल्याचं सांगण्यात येतं.