नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी सुयोग्य उमेदवार नसल्याचे नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे. सेन यांनी याआधीही मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर टीका केली होती. बोलपूर लोकसभा मतदारसंघातून सेन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदींवर टीका केली.
ते म्हणाले, मोदींबद्दल माझे काय मत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. ते पंतप्रधानपदाचे सुयोग्य उमेदवार आहेत, असे मला वाटत नाही. देशातील काही वर्गांमध्ये मोदी खूप प्रसिद्ध आहेत. विशेषतः व्यावसायिकांमध्येही तू खूप प्रसिद्ध आहेत. पण त्यामुळे ते मला आवडायला हवेत, असे होत नाही. देशातील अल्पसंख्याकांना ज्या नेत्याबद्दल भीती वाटणार नाही, अशा निधर्मी नेत्याकडे देशाचे नेतृत्त्व द्यायला हवे, असेही मत सेन यांनी मांडले.