पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुखांना ग्वाही

‘देशाचा आकार मोठा असला, विविधता असली तरी आर्थिक विकास आणि सामाजिक स्थिरता यांची संगती राखता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण भारताने जगासमोर ठेवले आहे. या पाश्र्वभूमीवर देशात स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी आर्थिक सुधारणा वेगाने राबवल्या जातील आणि त्याचबरोबर आर्थिक विकासात सर्वसमावेशकता व आर्थिक वाढीला पोषक ठरणारे धोरण यांची आखणी केली जाईल’, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तिन लॅगार्ड यांना दिली. केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडव्हान्सिंग एशिया’ या परिषदेत मोदी बोलत होते.

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत मोदी यांनी भारतातील बदलत्या परिस्थितीचे चित्र लॅगार्ड यांच्यापुढे उभे केले. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर मंदीचा झाकोळ असताना भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल आश्वासक आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म अशा अर्थस्थिरतेवर भारताची अर्थव्यवस्था आधारलेली असून आगामी काळात भारत हा संधी आणि उत्साहवर्धक वातावरण यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. देशात चलनवाढ कमी झाली आहे. आर्थिक मजबुती वाढत आहे. आयात-निर्यात समप्रमाणात आहे. परकीय चलनाची गंगाजळी भरपूर आहे, लागोपाठ दोन वर्षे कमी पाऊस पडला तरी आमचा आर्थिक विकास दर साडेसात टक्के आहे व तो अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तोडीचा आहे. अर्थव्यवस्था सुधारणेसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत जे केले त्यात आम्ही समाधानी नाही. स्थित्यंतरासाठी आर्थिक सुधारणा वेगाने राबवण्याकडेच आमचा कल राहणार आहे व त्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प पथदर्शी असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. २०१५च्या उद्योग अनुकूल निर्देशांकात भारताने चांगली प्रगती केली असल्याचेही मोदींनी यावेळी नमूद केले.

लॅगार्ड यांची स्तुतिसुमने

ख्रिस्तिन लॅगार्ड यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेवर स्तुतिसुमने उधळली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यमान परिस्थितीत भारत हा निश्चितच चमकणारा तारा असल्याचे लॅगार्ड म्हणाल्या. येत्या चार वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात किमान दोन तृतीयांश वाटा भारताचा असेल, असेही लॅगार्ड यांनी स्पष्ट केले.

चीनवर निशाणा?

आपल्या भाषणादरम्यान मोदी यांनी चीनवर अनुल्लेखाने निशाणा साधला. शेजारच्याला कंगाल करून तुमचा विकास साधा, अशी आमचे अर्थधोरण नाही. भागीदार देशांचा बळी देऊन व्यापार करण्याचे आमचे धोरण नाही. आम्ही कधीही स्वतच्या चलनाचे अवमूल्यन केले नाही, अशा शब्दांत मोदी यांनी चीनला टोले हाणले.

नवउद्यमी धोरणात भारत चौथा..

तांत्रिक नवउद्यमी धोरणात जगात भारताचा चौथा क्रमांक लागत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायल यांच्यानंतर भारतातच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तांत्रिक नवउद्यमी धोरण राबवले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

संपत्तीची निर्मिती करण्यासाठी सुयोग्य वातावरण व संपत्तीचा लाभ प्रत्येक भारतीयाला, गरिबांना, शेतकरी, वंचित गटांना मिळणे हे आमचे ध्येय आहे.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान