इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या क्रिकेट विश्वचषक २०१९ स्पर्धेमधून पाकिस्तान उपांत्य फेरीच्या आधीच बाहेर पडला आहे. न्यूझीलंडच्या संघापेक्षा सरासरी धावसंख्या कमी असल्याने ९ पैकी ५ सामने जिंकल्यानंतरही पाकिस्तान अंतीम चारमध्ये जागा मिळवू शकला नाही. १९९२ चा करिष्मा पाकिस्तान पुन्हा करुन दाखवण्याची शक्यता पाकिस्तानी चाहत्यांनी व्यक्त केली असतानच संघ बाहेर पडल्याने पाकिस्तानी चाहत्यांना धक्का बसला आहे. अगदी पाकिस्तीनी वाहिन्यांवरील चर्चांमधील तज्ज्ञही विचित्र वक्तव्ये करताना दिसत आहेत. पाकिस्तानी संघ घरी परतल्यानंतरही पाकिस्तानमधील क्रिकेट तज्ज्ञ भारतीय संघाबद्दल विचित्र वक्तव्ये करताना दिसत आहेत. याच वक्तव्यांमध्ये आणखीन एका विचित्र वक्तव्याची भर पडली आहे. श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद शामीला मुद्दाम अंतीम ११ खेळाडूंमध्ये जागा देण्यात आली नाही असे वक्तव्य एका पाकिस्तानी तज्ज्ञाने केले आहे.

पाकिस्तानमधील आज न्यूज या वृत्तवाहिनीवर भारत- श्रीलंका सामन्यावरील विश्लेषण सुरु होते. याच कार्यक्रमामधील एका तज्ज्ञाने हे वादग्रस्त विधान केले. ‘मी मोहम्मद शामीला संघातून वगळलं नसतं. तुमचा एक गोलंदाज आहे ज्याने तीन सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या आहेत. अचानक तुम्ही त्याला संघाबाहेर बसवता म्हणजे काय? त्याची वाटचालही विक्रमाच्या दिशेने होत होती. तो पण विश्वचषकातील अव्वल दोन किंवा तीन गोलंदाजांमध्ये आला असता. त्याला का बसवले मला समजत नाहीय. एक तर यांच्यावर (भारतीय संघावर) दबाव आहे की शामीला बाहेर बसवावं. शामीला दौऱ्यावर घेऊन तर आलेत पण त्याला खेळायला देत नाही. तो केवळ मुस्लीम असल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढण्यात आले. मुस्लिमांना पुढे येऊ द्यायचं नाही हा भाजपाचा अजेंडा आहे. याच्यामागे भाजपाचा हाथ असू शकतो,’ असं मत या तज्ज्ञाने नोंदवले आहे.

भारताने उपांत्य फेरीतील सामन्याआधी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये शामीला आराम देऊन त्याऐवजी रविंद्र जाडेजाला संघात संधी दिली होती. खेळपटी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी असल्याने शामीऐवजी जाडेजाला संधी देण्यात आली होती.