Edelweiss CEO Radhika Gupta on Life: बदलत्या जीवनशैलीनुसार आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन विकसित होत चालला आहे. तरूण पिढीला बचतीचे महत्त्व समजले असले तरी अनेकजण पैशांची बचत करून संपत्ती निर्माण करण्याकडे लक्ष देत असतात. जेणेकरून जेव्हा ते निवृत्त होतील, तेव्हा त्यांच्याकडे पुरेसा निधी असेल. पण एडलवाईस म्युच्युअल फंडच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी मात्र थोडा वेगळा विचार मांडला आहे. त्या म्हणतात, मी एसआयपीमध्ये लोकांनी गुंतवणूक करावी, यासाठी मदत करते. तरी मला वाटते की, लोकांनी वर्तमानाचा आनंद घ्यायला विसरू नये.

राधिका गुप्ता यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे गुंतवणूकदारांना जीवनाचा मुक्तहस्तपणे आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या, माझे काम एसआयपी विकणे असले तरी जीवन हे पैशांची शर्यत आणि चांगल्या पोर्टफोलिओपेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. गुप्ता यांची ही हृदयस्पर्शी पोस्ट आता चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकानी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

राधिका गुप्ता यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “मी माझा प्रवास एका स्वप्नाने सुरू केला होता. आज एका छोट्या आनंदाने माझे हृदय भरून पावले आहे. मेहनतीच्या फळाची गोडी काही औरच असते.”

बचत करा, पण स्वतः वर खर्चही करा

प्रत्येकाने जीवनाचा आनंदही घेतला पाहीजे, यावर राधिका गुप्ता यांनी भर दिला आहे. सर्वांनी नक्कीच बचत करावी, पण त्याचबरोबर जीवनाचा आनंदही घ्यायला हवा. “माझे काम जरी एसआयपी विकने असले तरी मी प्रत्येक तरूण आणि वृद्धांना सांगते की, तुमच्या अथक परिश्रमाचे फळ चाखण्यासाठी थोडा वेळ काढा. पैशांची बचत कराच, पण त्याचबरोबर तुम्हाला आनंद देईल अशा गोष्टींवर खर्चही करा. त्यामुळेच जीवनाचा प्रवास सुखकर होतो”, अशी भावना राधिका गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधिका गुप्ता गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करताना म्हणतात की, आर्थिक नियोजन करा, पण तुमच्या आनंदाचा ताबा या नियोजनाला घेऊ देऊ नका. पैसे गुंतवणे हे एक साधन आहे, जीवन जगण्याचे साध्य नाही. बचत करणे याचा अर्थ फक्त बँक खाते फुगवणे नसून त्यातून एक समाधानकारक जीवन निर्माण करणे आहे.