देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ (Mood of The Nation 2020) सर्वेक्षणात मोदी सरकारने करोना स्थिती कशी हाताळली यासंबंधी लोकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ४८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाविरोधातील लढाईत चांगलं काम केल्याचं म्हटलं आहे. तर २९ टक्के लोकांनी खूप चांगलं काम केल्याचं मत नोंदवलं आहे. १८ टक्के लोकांनी ठीक काम केलं असल्याचं म्हटलं असून पाच टक्के लोकांनी मात्र वाईट असं मत नोंदवलं आहे.

सर्वेक्षणात इतर देशांशी तुलना करता भारताने करोनविराधातील लढाईत कशी कामगिरी केली असं विचारण्यात आलं. यावर ४३ टक्के लोकांनी चांगली म्हटलं असून ४८ टक्के लोकांनी इतर देशांशी समान तर सात टक्के लोकांनी खराब कामगिरी असल्याचं सांगितलं. दोन टक्के लोकांनी यावर उत्तर देण्यास नकार दिला.

यावेळी करोनाविरोधातील लढाईत राज्य सरकारांनी केलेल्या कामगिरीबद्दलही विचारण्यात आलं. यावर २३ टक्के लोकांनी खूप चांगल तर ४८ टक्के लोकांनी चांगलं असं सांगितलं. २२ टक्के लोकांनी ठीक काम केल्याचं म्हटलं असून सात टक्के लोकांनी खऱाब कामगिरी केल्याचं सांगितलं आहे.

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरील जनतेचा विश्वास जवळपास कायम; सर्वेक्षणाचा निष्कर्ष

करोनामुळे किती नुकसान झालं असं विचारण्यात आलं असता २२ टक्के लोकांनी व्यवसाय आणि नोकरीत नुकसान झाल्याचं सांगितलं. ६३ टक्के लोकांनी उत्पन्न कमी झाल्याचं सांगितलं असून १५ टक्के लोकांनी काहीच फरक पडला नसल्याचं म्हटलं. तर एक टक्का लोकांनी उत्पन्न वाढल्याचं सांगितलं.

लॉकडाउनमुळे लोकांचा जीव वाचवण्यात यश मिळालं का असं विचारण्यात आलं असता ३४ टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं, तर ३८ टक्के लोकांनी आर्थिक त्रास सहन करावा लागला मात्र जीव वाचला असं म्हटलं आहे. २५ टक्के लोकांनी नाही उत्तर दिलं असून तीन टक्के लोकांनी उत्तर देण्याचं टाळलं. केंद्र सरकारने प्रवासी मजुरांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधा दिली पाहिजे का असं विचारलं असता ७१ टक्के लोकांनी हो तर २१ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. आठ टक्के लोकांनी उत्तर देण्यास नकार दिला.