काश्मीरमधील अस्थिर परिस्थिती आणि दहशतवादाचे सावट असूनही या वर्षी २.६० लाख भाविकांनी अमरनाथ यात्रा केली. नुकताच या यात्रेचा समारोप झाला. श्री अमरनाथजी यात्रा मंडळाने (एसएएसबी) नुकतीच यात्रेदरम्यानची आकडेवारी जारी केली आहे. दि. २९ जून ते ऑगस्ट दरम्यान यात्रा पार पडली.

यंदा गत वर्षीच्या तुलनेत ४० हजार भाविक अधिक होते. गतवर्षी २.२० लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले होते. वर्ष २०११ मध्ये अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ६.३४ लाख होती. २०१४ मध्ये ३.७० लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. वर्ष २०१५ पासून ही आकडेवारी घसरत गेली होती.

दरम्यान, यंदाच्या अमरनाथ यात्रेत सहभागी झालेल्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात गुजरात व महाराष्ट्रातील भाविकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतरही भाविकांनी उत्साहाने यात्रा पूर्ण केली होती. विशेष म्हणजे या यात्रेपूर्वीच गुप्तचर संस्थांनी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली होती.