वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘आपण मानवी इतिहासातील सर्वात धोकादायक टप्प्यावर पोहोचत आहोत,’ असा इशारा प्रसिद्ध अमेरिकन भाषातज्ञ, तत्त्वज्ञ, इतिहासकार नोम चॉम्स्की यांनी दिला आहे. ब्रिटिश मासिक ‘न्यू स्टेट्समन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जागतिक तापमानवाढ आणि युक्रेन युद्धावर बोलताना सांगितले, की रशियन आक्रमणानंतर युक्रेन देश उद्ध्वस्त झाला आहे. आता जर आपण यावर समाधानकारक तोडगा काढण्याची संधी गमावली, तर अंतिम आण्विक युद्धाकडे वाटचाल सुरू होईल.

९३ वर्षीय चॉम्स्की यांनी सांगितले, की पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने संभाव्य नैसर्गिक संकटामुळे सुनियोजित मानवी जीवन उद्ध्वस्त होण्याच्या धोका आहे. ही शक्यता फार दूरची नाही. यात सुधारणा शक्य नसल्याने आपण आपले परतीचे दोर कापून टाकत आहोत. भविष्यात सगळे मृत्युमुखी पडतील, असा याचा अर्थ नाही. मात्र, जे लवकर मृत्युमुखी पडतील ते नशीबवान असतील.

रशिया- युक्रेन युद्धाबद्दल.. सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध हे राक्षसी आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या युद्धखोर वर्तनावर टीका करताना चॉम्स्की म्हणाले, की त्यांनी असे का केले असावे या प्रश्नाकडे दोन पद्धतीने पाहता येते. पाश्चिमात्यांच्या लाडक्या पद्धतीने पाहिल्यास पुतीन यांच्या थांग न लागणाऱ्या मनात डोकावून त्यांच्या खोल मनात काय चालले आहे, याचा अदमास घ्यायचा. दुसरी पद्धत म्हणजे या युद्धामागे अमेरिकेच्या वर्तणुकीचा अन्वयार्थ लावायचा. सप्टेंबर २०२१ मध्ये अमेरिकेने युक्रेनला वाढीव लष्करी सहकार्य देण्याचे धोरण जाहीर केले. तसेच युक्रेनला अद्ययावत शस्त्रपुरवठाही केला. युक्रेन ‘नाटो’ संघटनेचा सदस्य होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न अमेरिकेने केले. त्यामुळे या युद्धामागील कारणांचा अन्वयार्थ आपापल्या पद्धतीने लावावा. नैतिकदृष्टय़ा पुतीन अयोग्य असल्याने त्यांच्याविरुद्ध संताप समजू शकला, तरी त्यांना विरोध करणारी अमेरिका तरी कुठे योग्य वागते? अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या भुकेकंगाल अवस्थेमागे अमेरिका आहे, हेही नाकारून चालणार नाही