मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात असलेल्या चितोरा गावातील एका शाळेत तोफगोळा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र त्याचवेळी पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पटेल याने दाखवलेल्या धाडसामुळे या सगळ्या मुलांचा जीव वाचला आहे. अभिषेक पटेल या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चितोरा गावातील शाळेत बॉम्ब सापडल्याची माहिती १०० या क्रमांकावर पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पटेल यांना मिळाली होती ते तातडीने शाळेत पोहचले तेव्हा त्या शाळेत एक तोफगोळा येऊन पडला आहे हे त्यांच्या लक्षात आले. तसेच शाळेत सुमारे ४०० मुले असल्याचीही माहिती त्यांना मिळाली. आता इतक्या सगळ्या मुलांचा जीव कसा वाचवायचा हा त्यांच्यापुढचा मुख्य प्रश्न होता.

तोफगोळा निकामी करणारे पथकही यायला वेळ होता. त्यामुळे त्यांनी अचानक एक निर्णय घेतला की हा तोफगोळा घेऊन शक्य तेवढ्या लांब जायचे. त्यांनी हा तोफगोळा आपल्या खांद्यावर घेतला आणि धावत सुटले. या गोळ्याचे वजन १० किलो आणि लांबी १२ इंच इतकी होती. एवढ्या वजनाचा बॉम्ब किंवा तोफगोळा फुटला तर ५०० मीटर परिसरात त्याचा परिणाम होतो हे अभिषेक यांना सांगण्यात आले होते. म्हणूनच त्यांनी हा तोफगोळा उचलला आणि ते सुमारे १ किलोमीटर लांब धावत गेले.

आपण बऱ्यापैकी अंतर पुढे आलो आहोत हे लक्षात येताच तातडीने अभिषेक पटेल यांनी हा तोफगोळा फेकून दिला. ते धावत असताना त्यांच्या टीमचे सदस्य त्यांना सांगत होते की हा तोफगोळा लगेच फेकून दे आणि लांब पळ, कारण हा तोफगोळा फुटला तर अभिषेक पटेल यांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या असत्या. मात्र अभिषेक पटेल यांनी काहीही ऐकले नाही आणि एक किलोमीटर धावत गेले तिथे मोकळ्या जागेत गेल्यावर त्यांनी हा तोफगोळा फेकला. ४०० मुलांचा जीव वाचविण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करणाऱ्या या कॉन्स्टेबलचे आता चितोरा गावात कौतुक होते आहे. तसेच त्यांचा हा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

हा तोफगोळा या शाळेत कसा आला याचाही शोध सुरू आहे. शाळेच्या आवारात सैन्य दलाची एक फायरिंग रेंज आहे कदाचित त्याच भागातून हा तोफगोळा शाळेत येऊन पडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र यासंदर्भातील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp cop runs 1km with 10 kg bomb in hand to save lives of 400 students
First published on: 27-08-2017 at 19:47 IST