“नेहरुंनी १९४७ रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणामुळेच अर्थव्यवस्था बिघडली”

महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही; भाजपा नेत्याने नेहरुंना जबाबदार धरत साधला काँग्रेसवर निशाणा

MP minister Vishwas Sarang, inflation, Indian Economy, Red Fort, Jawarlal Nehru, 1947, Red Fort,
महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही; भाजपा नेत्याने नेहरुंना जबाबदार धरत साधला काँग्रेसवर निशाणा (Photo: Express Achieve)

महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन केलेल्या भाषणातील चुकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली असं वक्तव्य भाजपा नेत्याने केलं आहे. मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी हे विधान केलं आहे. पहिले पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाने जर अर्थव्यवस्था योग्य स्थितीत ठेवली असती तर आज महागाई नियंत्रणात असती असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे. ते भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसकडून वाढते इंधनदर आणि इतर मुद्द्यांवरुन आंदोलन करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता विश्वास सारंग यांनी म्हटलं की, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते नेहरु कुटुंब आहे”.

“महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसात उभारला जात नाही. जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन भाषण देताना केलेल्या चुकांमुळेच देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे,” असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी मोदी सरकारने गेल्या सात वर्षात अर्थव्यवस्था बळकट केली असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत. भाजपाच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून लोकांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे असा दावा त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खऱं तर सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं पाहिजे असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

यानंतर पीटीआयशी बोलताना विश्वास सारंग यांनी आपली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असून नेहरुंनी त्याकडेच दुर्लक्ष केलं होतं असा आरोप केला. “७० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून नेहरुंनी या क्षेत्राची चिंताच केली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था आत्मनिर्भर आणि टिकणारी होती. नेहरुंनी आपली पाश्चिमात्य विचारसरणी लादली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संपवली,” असं ते म्हणाले. सध्याच्या स्थितीसाठी नेहरुंची चुकीची धोरणं जबाबदार आहेत अशी टीका यावेळी त्यांनी केली. औद्योगीकरण ठीक होतं, पण शेती त्याचा मूळ आधार असणं गरजेचं होतं असं ते म्हणाले.

काँग्रेसचं उत्तर

काँग्रेसचे प्रवक्ते के के मिश्रा यांनी टीकेला उत्तर दिलं असून, “शिवराज सिंग यांच्या मंत्रीमंडळातील विश्वास सारंग महागाईसाठी नेहरुंच्या १९४७ मधील भाषणाला जबाबदार धरत आहेत, ज्यावेळी त्यांचा जन्मही झाला नव्हता. आरोग्यमंत्री म्हणून नेहरुच करोनामुळे झालेल्या हजारो मृत्यू, बेड्सची कमतरता, ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा यासाठी जबाबदार होते म्हणणार का?,” अशी विचारणा केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mp minister vishwas sarang says inflation problems started with nehrus 1947 speech from red fort sgy

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?