कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नामपत्राचा (लेटरहेड) गैरवापर केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला त्यांचा स्वीय सहायक संजीत बॅनर्जी यांच्या चौकशीत अनेक तथ्ये समोर आली आहेत. डॉ. शिंदे यांची बनावट स्वाक्षरी करून बॅनर्जीने या नामपत्राद्वारे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या समितीवर दोन जणांची नेमणूक केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे अनेक खासदारांकडून शिफारसपत्र घेऊन बॅनर्जी याने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या ‘पर्सनल स्टाफ’मध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रेल्वे मंत्रालयात त्यांची डाळ शिजली नाही. खासदारांची बनावट स्वाक्षरी करून गैरवापर करणाऱ्यांची मोठी टोळी दिल्लीत सक्रिय आहे. या टोळीची पाळेमुळे रेल्वेसह अन्य बडय़ा मंत्रालयापर्यंत रुजली आहेत. बॅनर्जीसह अन्य दोन खासदारांच्या स्वीय साहाय्यकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
‘मराठीबाणा’ जपणाऱ्या अर्धा डझन खासदारांनी बॅनर्जीला ‘पर्सनल स्टाफ’मध्ये घेण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूू यांना पत्र धाडले होते. मात्र प्रभूंनी कुणालाही प्रतिसाद दिला नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून डॉ. शिंदे यांनाच बॅनर्जीवर संशय होता. ‘तुम्ही नामनिर्देशित केलेले सदस्य मंत्रालयाने संबंधित समितीवर नियुक्त केले आहे,’ असे पत्र डॉ. शिंदे यांना अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्राप्त झाले होते. नेमके त्याच वेळी डॉ. शिंदे यांनी मंत्रालयास स्वत:च्या स्वाक्षरीचे पत्र पाठवले होते. खा. चिराग पासवान यांनी डॉ. शिंदे यांना तुमच्याकडून दोन पत्रे आल्याची माहिती पुरवली. तेव्हा शिंदे यांचा संशय बळावला. त्यांनी संबधित मंत्रालयाकडून सर्व पत्रे मागवली. त्यापैकी दोन पत्रांवर शिंदे यांची बनावट स्वाक्षरी होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र संपताच डॉ. शिंदे यांनी ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला. अवघ्या आठवडाभरात पोलिसांनी बॅनर्जीला पुण्यात अटक केली. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर खासदारांच्या बनावट नामपत्राचा वापर करणारी मोठी टोळीच दिल्लीत सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी धडक कारवाई करत अरविंद तिवारी, संदीप सिंह (दोघे नवी दिल्ली), महादेव रेड्डी (नवी मुंबई), बाबासाहेब खरात (वाशी), प्रदीप लोटेकर (कांदिवली) व लांजेकर (गोंदिया) व बॅनर्जीसह सात जणांना ताब्यात घेतले आहे. या टोळीच्या चौकशीत अनेक तथ्ये समोर येतील, अशी प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी दिली. या प्रकरणापासून धडा घेत सर्वच खासदारांनी सावध होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mps personal assistant scandle in delhi
First published on: 11-04-2015 at 02:31 IST