नवी दिल्ली : दिल्लीतील रस्ते आणि स्थळांच्या नामांतरांचा सपाटा कायम असून आता राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘मुघल गार्डन्स’चे नाव बदलून ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. ‘गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याच्या मार्गातील आणखी एक निर्णय’ अशा शब्दांत भाजपने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राष्ट्रपती भवनामध्ये ईस्ट लॉन, सेंट्रल लॉन, लाँग गार्डन आणि सक्र्युलर गार्डन अशी चार उद्याने होती. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद यांनी हर्बल गार्डन १ आणि २, बोन्साय गार्डन आणि आरोग्य वन ही नवी उद्याने विकसित केली. या सर्व उद्यानांना ‘अमृत उद्यान’ म्हटले जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चार महिन्यांपूर्वी झालेल्या भव्य सोहळय़ात ‘राजपथ’चे नाव ‘कर्तव्यपथ’ करण्यात आले होते. या कार्यक्रमातील भाषणात मोदींनी, ‘राजपथ’ गुलामगिरीचे प्रतीक असून स्वतंत्र भारताने ही मानसिकता झुगारून दिली पाहिजे. आता हा पथ ‘कर्तव्यपथ’ म्हणून ओळखला जाईल, असे नमूद केले होते. पंतप्रधानांच्या याच विचारांतून प्रेरणा घेऊन ‘मुघल गार्डन्स’ आता ‘अमृत उद्यान’ झाले आहे. ‘देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली असून त्यानिमित अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. हे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील उद्यानांचे ‘अमृत उद्यान’ असे नामकरण केले आहे’, अशी माहिती राष्ट्रपती भवनाच्या माध्यम विभागातील उपसचिव नाविका गुप्ता यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
जम्मू आणि काश्मीरची मुघल गार्डन्स, ताजमहालच्या सभोवताली असलेली उद्याने तसेच भारतीय आणि पर्शियन लघुचित्रांपासून प्रेरणा घेऊन राष्ट्रपती भवनात १५ एकरांच्या विशाल परिसरामध्ये विविध उद्यानांची निर्मिती केली गेली आणि या उद्यानांना ‘मुघल गार्डन्स’ म्हटले जाऊ लागले. देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी लोकांना पाहण्यासाठी ‘मुघल गार्डन्स’ खुले केले. त्यानंतर दरवर्षी हिवाळय़ात एक महिन्यासाठी ‘मुघल गार्डन्स’ पाहता येत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत ही ओळख कायमची पुसली जाणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावरही ‘अमृत उद्यान’ असा उल्लेख पाहायला मिळू लागला आहे. राष्ट्रपती भवनातून ‘मुघल गार्डन्स’चे फलकही काढून टाकण्यात आले आहेत. ‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळात गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याच्या क्रमवारीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणखी एक ऐतिहासिक निर्णय’, असे ट्वीट करून ‘मुघल गार्डन्स’च्या नामांतराचे भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी स्वागत केले आहे. केंद्रीयमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यासह अन्य नेत्यांनीही नामांतराच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
दोन महिने सर्वाना प्रवेश
‘अमृत उद्याना’ला अधिकाधिक लोकांनी भेट द्यावी, या उद्देशाने ३१ जानेवारी ते २६ मार्च असे दोन महिने सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत दररोज साडेसात हजार ते १० हजार लोकांना प्रवेश दिला जाईल. २८ ते ३१ मार्च हे अखेरचे चार दिवस अनुक्रमे शेतकरी, अपंग, लष्कर, निमलष्कर आणि पोलीस दलांतील व्यक्ती आणि प्रामुख्याने आदिवासी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
वैशिष्टय़े काय?
उद्यानात १३८ प्रकारचे गुलाब, ११ प्रकारचे टय़ुलिप, ५ हजार मौसमी फुलांच्या प्रजाती यांच्यासह अनेक वैविध्यपूर्ण फुले-झाडे आहेत. इथल्या फुलांना आणि झाडांना ‘क्यूआर कोड’ देण्यात आले असून मोबाइलवर ते स्कॅन करून अधिक माहिती तात्काळ मिळू शकेल.