मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहे. देशातील आणखी एक मोठा उद्योग समूह असलेल्या पिरामल इंटरप्रायजेसचे अजय पिरामल यांचा मुलगा आनंद याच्याबरोबर इशाचा विवाह होणार आहे. आनंद आणि इशा जुने मित्र आहेत. आनंदने महाबळेश्वरच्या मंदिरात इशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. दोन्ही कुटुंबियांचे सुमारे ४० वर्षांपासून चांगले संबंध आहेत.

मुकेश अंबानी यांची मुलगी इशा हिचा पिरामल उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक आनंद यांच्याबरोबर साखरपुडा झाला. अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांनी दक्षिण मुंबईतील इस्कॉनच्या हरे राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. (छायाचित्र: गणेश शिर्सेकर)

लग्नाच्या प्रस्तावानंतर दोन्ही कुटुंबियांनी एकत्र भोजन घेत आनंद साजरा केला. यावेळी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी समवेत इशाची आजी कोकिलाबेन अंबानी आणि दोन्ही भाऊ आकाश, अनंत हेही उपस्थित होते.

आनंदने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून सध्या तो पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आहे. त्याने पेन्सिलवेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. हार्वर्डमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने दोन स्टार्टअप सुरू केले. पिरामल रिअल्टीपूर्वी आनंदने ग्रामीण आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवत ‘पिरामल स्वास्थ्य’ची स्थापना केली होती. सध्या या माध्यमातून एका दिवसांत ४० हजारहून अधिक रूग्णांची तपासणी केली जाते. आनंद इंडियन मर्चंट चेंबर-यूथ विंगचा सर्वांत युवा अध्यक्षही राहिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इशा अंबानी रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेल मंडळाची सदस्य आहे. तिने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि साऊथ एशियन स्टडीजमधून पदवी मिळवली आहे. जूनमध्ये ती बिझनेस स्टॅनफोर्डमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमधून पदव्युत्तर पदवी पूर्ण करेल. विशेष म्हणजे इशाचा भाऊ आकाशही या वर्षाच्या अखेरीस श्लोका मेहताबरोबर विवाह बंधनात अडकणार आहे.