प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. लवकरच मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता विवाहबंधनात अडकणार आहेत. मागच्या बरेच दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा होती. आकाशच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. श्लोका ही प्रसिद्ध हिरेव्यापारी रसेल मेहता यांची धाकटी मुलगी आहे. आनंद आणि श्लोका हे दोघंही एकमेकांना शाळेपासूनच ओळखतात असं म्हटलं जातं. आता आकाश आणि श्लोका या दोघांचीही कुटुंबे पाहता त्यांच्या लग्नाचा थाट अद्वितीय असणार असेच सर्वांना वाटत आहे. मात्र हे लग्न कोणत्याही मोठ्या हॉटेलमध्ये किंवा परदेशात न होता एका धार्मिक स्थळी लावण्यात येणार आहे.

हिमालयाच्या शिखरांमध्ये असलेल्या रुद्रप्रयाग येथील त्रियुगी नारायण मंदिरात या दोघांचा लग्नसोहळा होणार आहे. शिव आणि पार्वतीचे लग्नही याच ठिकाणी झाल्याच्या आख्यायिका आहेत. इथे झालेली लग्नं सात जन्म टिकतात अशी भक्तांची धारणा आहे. त्यामुळे काही जण याठिकाणी येऊन लग्न करतात. आता त्यात या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या लग्नाचीही भर पडणार आहे. सध्या परदेशात किंवा एखाद्या हिल स्टेशनवर किंवा स्पेशल डेस्टीनेशनवर जाऊन लग्न करण्याचे फॅड आहे. मात्र तसे न करता अंबानी आणि मेहता कुटुंबियांनी हा अनोखा निर्णय घेतला आहे.

हे मंदिर ९ हजार फूट उंचीवर असून उत्तराखंड सरकारने या मंदिराला वेडिंग डेस्टीनेशनचा दर्जा दिला आहे. आतापर्यंत अभिनेत्री कविता कौशिक, उत्तराखंडचे माजी मंत्री धनसिंह रावत आणि आयएएस अपर्णा रावत यांची लग्नं या मंदिरात झाली होती. आता याठिकाणी नेमके कोण सेलिब्रिटी उपस्थित राहणार आणि नंतर पुन्हा रिसेप्शन होणार का, ते कुठे होणार हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

श्लोका मेहता हिने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रिंस्टन युनिव्हर्सिटीतून अँथ्रोपोलॉजीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटीकल सायंसची निवड केली. २०१४ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्लोकाने ‘रोसी ब्ल्यू फाऊंडेशन’मध्ये संचालक म्हणून पदभार सांभाळला. इतंकच नाही, तर श्लोका ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची सहसंस्थापिकाही आहे. ही संस्था विविध एनजीओंची मदत करते.