गोमांस खाऊ इच्छिणाऱ्यांनी किंवा विकणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, अशी भूमिका गुरुवारी मांडल्यानंतर केंद्रीय मंत्री मुख्तार नक्वी यांनी आता खाण्याच्या निवडीवरून बहुसंख्याकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, अशी सारवासारव केली आहे.
देशातले कोटय़वधी लोक गायीला पूजतात, गोमाताही म्हणतात. त्याचप्रमाणे मी मुस्लिम असून माझ्या वस्तीत कोणी डुकराच्या मांसाची विक्री करायचे म्हटल्यास मी काही बोलणार नाही परंतु माझ्या वस्तीतील लोक अशी विक्री करू इच्छिणाऱ्यास बाहेर काढतील, असे नक्वी म्हणाले. वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात  नक्वी यांनी गोमांसाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वादळ उठले होते.