जातीयवादी शक्तींना बळ देण्यासाठी सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांनी भाजपशी जवळीक साधल्याचा आरोप केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे. हिंमत असेल तर मुलायमसिंह यांनी बाबरी मशिदीच्या प्रश्नावर जाहीर चर्चेसाठी यावे, असे आव्हानही वर्मा यांनी आपल्या एकेकाळच्या मित्राला दिले.
राम मंदिराच्या प्रश्नावरून तणाव निर्माण करून भाजप राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याचा लाभ भाजप आणि सपालाच होणार आहे, असेही वर्मा म्हणाले. लखनऊ आणि फरिदाबाद न्यायालयात २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी खलिद मुजाहिद याचा कोठडीत मृत्यू झाला त्याची एनआयएमार्फत चौकशी करण्याची मागणी सपाने का केली नाही, असा सवालही त्यांनी केला. या हल्ल्यांमागे उजव्या हिंदू संघटनांचा हात असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
मुलायमसिंह यांनी बाबरी मशिदीच्या प्रश्नावर चर्चेसाठी समोरासमोर यावे, आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ आणि त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हानही वर्मा यांनी मुलायमसिंह यांना दिले. उत्तर प्रदेशात सपाचे सरकार आहे, त्यांनी केंद्र सरकारला बाबरी प्रश्नाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस करावी, असेही वर्मा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
गोध्रा प्रकरणानंतर गुरातमध्ये झालेल्या निवडणुका सपाने लढविल्या होत्या आणि त्यानंतर संसदेत झालेल्या चर्चेच्या वेळी भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी मुलायमसिंह यांची बाजू घेतली होती, असेही वर्मा म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2013 रोजी प्रकाशित
मुलायमसिंह यांचे भाजपशी साटेलोटे बेनीप्रसाद वर्मा यांचा हल्लाबोल
जातीयवादी शक्तींना बळ देण्यासाठी सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांनी भाजपशी जवळीक साधल्याचा आरोप केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे. हिंमत असेल तर मुलायमसिंह यांनी बाबरी मशिदीच्या प्रश्नावर जाहीर चर्चेसाठी यावे, असे आव्हानही वर्मा यांनी आपल्या एकेकाळच्या मित्राला दिले.

First published on: 07-07-2013 at 03:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mulayam conniving with bjp to stoke communal tension beni