नवी दिल्ली : दिल्ली न्यायालयाने २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याला त्याच्या भावाशी या महिन्यात तीन वेळा फोनवर बोलण्याची बुधवारी परवानगी दिली. याद्वारे त्याला खासगी वकिलाशी चर्चाही करता येईल. दरम्यान, विशेष न्यायाधीश चंदर जीत सिंग यांनी राणाच्या न्यायालयीन कोठडीत ८ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.

या सुनावणीला राणा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित झाला होता. बंदद्वार झालेल्या सुनावणीत राणा याचे फोन कॉल रेकॉर्ड केले जातील आणि त्याचे संभाषण तुरुंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावे, असे आदेशही न्यायाधीशांनी दिले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदेशीर मदत करणारे वकील पीयूष सचदेव यांनी आरोपपत्र आणि पुरवणी आरोपपत्र तपासण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.