इसिसच्या अपहरणकर्त्यांनी ठार केलेल्या केन्जी गोटो या पत्रकाराने त्याच्या मृत्युपूर्वी शांततेसाठी केलेल्या आवाहनाचा संदेश हा सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात फिरत असून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.
या संदेशात गोटो याने म्हटले आहे, की डोळे बंद करा व शांत राहा. जर तुम्हाला राग आला असेल किंवा किंचाळावेसे वाटत असेल, तरी तुम्ही शांत व्हाल. ते प्रार्थनेसारखेच आहे. कुणाचा द्वेष करणे हे माणसाचे काम नाही, न्याय हा परमेश्वराच्या हातात आहे. माझ्या अरब बंधूंनी मला तेच शिकवले आहे. गोटो याने ७ सप्टेंबर २०१० रोजी हा ट्विट केला होता. आज दुपापर्यंत हा ट्विट जास्त प्रमाणात रिट्विट केला गेला असून जपानी भाषेत २६ हजार वेळा पाठवला गेला आहे व इंग्रजी भाषेतही तो फिरत आहे. गोटो याची इसिसच्या अतिरेक्यांनी क्रूरपणे हत्या केली होती, त्यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली होती. इतके दिवस जपान हा पाश्चिमात्य देश सामोरे जात असलेल्या हिंसाचारापासून मुक्त होता. आता त्यांनाही मुस्लीम अतिरेक्यांच्या क्रूरतेचा सामना करावा लागत आहे. गोटो याच्या आईने रविवारी असा इशारा दिला होता, की भावनांना विघातक रूप देऊ नका, दु:खाने द्वेषाची मालिका बनता कामा नये असे त्याची आई जुन्को इशिडो हिने म्हटले होते.
गोटो हा मुक्त पत्रकार होता व त्याने १९९६ मध्ये व्हिडिओ कंपनी काढली होती. तो मध्य पूर्व व इतर भागांवरील माहितीपट जपानी दूरचित्रवाणीला देत होता. युद्धक्षेत्रात मुलांवर होणारे अत्याचार त्याने मांडले होते. त्याच्या सुटकेसाठी २०० दशलक्ष डॉलरच्या खंडणीची मागणी इसिसच्या बंडखोरांनी केली होती. जॉर्डनमध्ये असलेली साजिदा अल रिशावी हिला मृत्यूदंडाची शिक्षा झाली असून तिला सोडून देण्यात यावी अशीही मागणी होती. गोटो व युकावा या दोन जपानी ओलिसांची इसिसने हत्या केली होती.