पीटीआय, वाराणसी

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने रविवारी सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानवापी मशीद संकुलात सर्वेक्षणाचे काम केले. तर सर्वेक्षणाबाबत खोटय़ा बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप करत मुस्लिम पक्षकारांनी या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.सरकारी वकील राजेश मिश्रा यांनी सांगितले, की पुरातत्त्व विभागाने रविवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वेक्षणाचे काम सुरू केले. सकाळी ८ वाजता सर्वेक्षण पथक ज्ञानवापी संकुल परिसरात दाखल झाले. सायंकाळी पाचपर्यंत सर्वेक्षणाचे काम सुरू होते. जेवणासाठी दुपारी दोन तास हे काम बंद थांबवण्यात आले होते. हिंदू पक्षकारांचे एक वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले, की रविवारी तिन्ही घुमटांखाली शास्त्रीय पद्धतीने चाचण्या करण्यात आल्या. तेथे छायाचित्रण, मानक चित्रण, मोजमापाचे काम केले गेले.

हिंदू पक्षकारांचे अन्य एक वकील सुधीर त्रिपाठी यांनी रविवारी ‘ज्ञानवापी’च्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले की, शनिवारी सर्वेक्षणासाठी ‘डिफरेन्शियल ग्लोबल पोझिशिनग सिस्टम्स’सह (डीजीपीएस) अनेक आधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात आला. आतापर्यंतच्या सर्वेक्षणावर हिंदू-मुस्लिम दोन्ही पक्षकार समाधानी आहेत, असा दावा त्रिपाठी यांनी केला.

मुस्लिम पक्षकारांचा इशारा

ज्ञानवापी मशिदीच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी’चे सहसचिव सय्यद मोहम्मद यासीन म्हणाले, की सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुस्लीम पक्षकारांनी दुसऱ्या दिवशी आणि आजही सर्वेक्षणात सहभाग घेतला. आमचे वकील या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. मात्र, सर्वेक्षणाबाबत ज्याप्रकारे बिनबुडाची माहिती-बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या रोखल्या गेल्या नाहीत, तर आम्ही पुन्हा सर्वेक्षणावर बहिष्कार घालू शकतो.

हिंदू याचिकाकर्त्यांचा दावा

हिंदू पक्षकारांपैकी एक याचिकाकर्त्यां सीता साहू यांनी शनिवारी ज्ञानवापी संकुल परिसरातून बाहेर पडल्यानंतर तेथील एका भिंतीवर अर्ध प्राणी-देवतेची मूर्ती दिसल्याचा दावा केला होता. तसेच तळघरात खंडित मूर्ती आणि खांब असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

मशीद कमिटीचा आक्षेप..

शनिवारच्या सर्वेक्षणादरम्यान काही प्रसारमाध्यमांनी मशिदीच्या तळघरात मूर्ती, त्रिशूळ आणि कलश असल्याच्या खोटय़ा बातम्या पसरवल्या होत्या. त्यामुळे मुस्लीम समाज दुखावला जात आहे. असे प्रकार तातडीने न थांबवल्यास मुस्लीम पक्षकार पुन्हा एकदा सर्वेक्षणावर बहिष्कार घालतील, असा इशारा मशिदीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी’चे सहसचिव सय्यद मोहम्मद यासीन यांनी दिला.