कराचीमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट (एमक्यूएम) या पाकिस्तानातील विरोधी पक्षाला भारताकडून मदत मिळत असल्याच्या वृत्ताचे पक्षाने जोरदार खंडन केले आहे.
पाकिस्तानमधील एमक्यूएमला भारताकडून मदत मिळत आहे, असे वृत्त एका आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीने दिले होते. एमक्यूएमला भारताकडून प्रशिक्षण आणि निधी उपलब्ध करून दिला जातो, असे ब्रिटिश पोलिसांना एमक्यूएमच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले, अशी माहिती पाकिस्तानातील दोन उच्चाधिकाऱ्यांनी दिली, असा दावा या दूरचित्रवाणी वाहिनीने केला आहे.
तथापि, एमक्यूएमचा प्रवक्ता मोहम्मद अली सैफ याने या वृत्ताचे जोरदार खंडन केले असून, त्यामध्ये नवे काहीही नसल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही एमक्यूएमवर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. मात्र त्यानंतर ज्यांनी असे आरोप केले त्यांनीच ते मागे घेतले, असेही सैफ म्हणाले.
एमक्यूएमला भारताकडून निधी उपलब्ध झाला, असे पक्षाच्या कोणत्याही नेत्याने ब्रिटिश पोलिसांना सांगितलेले नाही. सदर दूरचित्रवाणी वाहिनीकडे त्याबाबतचे पुरावे असल्यास त्यांनी ते सादर करावे, असेही सैफ याने सांगितले.
दूरचित्रवाणी वाहिनीच्या वृत्ताची तपासणी केली जात असून, गरज भासल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्यात येईल. भारताकडूनच  एमक्यूएमला मदत मिळत असल्याचे या पक्षाची चौकशी करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना पाकिस्तानातील सूत्रांनी सांगितले.
भारताने गेल्या १० वर्षांत एमक्यूएमच्या १०० हून अधिक जणांना स्फोटके, शस्त्रे आणि घातपाताचे प्रशिक्षण दिले, असेही पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा वाहिनीने केला आहे. एमक्यूएमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मुलाखतींची फीत तयार करण्यात आली असून, त्यामध्ये भारताकडून निधी मिळत असल्याचा दावा नेते करीत असल्याचे चित्रीकरण आहे, असे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.