जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला आदिल अहमद दार या आत्मघातकी दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफ जवानांच्या बसला धडकवली. यात ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर देशभरामधून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे. असे असतानाचा उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरच्या भाजपा आमदाराने आगळ्यावेगळ्या माध्यमातून या हल्ल्याच्या विरोध केला आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी होर्डिंग्स आणि बॅनर्स लावून या आमदाराने पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरामध्ये लावण्यात आलेल्या शेकडो होर्डिंग आणि बॅनर्समध्ये भाजपा आमदार कपिल देव अग्रवाल यांनी मोदींकडे पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली आहे. ‘करोडो सर झुक जाएंगें मोदी तेरे सम्मान मे, बस एक बार सर्जिकल स्ट्राइक दोहरा दो पूरे पाकिस्तान में’ असा मजकूर असणारे होर्डिंग्स आणि बॅनर्स अग्रवाल यांनी शहरामध्ये लावले आहेत. होर्डिंगवर भारतीय सैनिकांबरोबरच पंतप्रधान मोदी आणि अग्रवाल यांचा फोटोही लावण्यात आला आहे.

या बॅनरबाजीबद्दल एका हिंदी वृत्तवाहिनिशी बोलताना अग्रवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘पुलवामामध्ये भारतीय सैनिकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यामध्ये भारतीय जवान शहीद झाले. दहशतवाद्यांमध्ये भारतीय सैैन्याचा सामना करण्याची हिंमत नसल्याने त्यांनी छुप्या पद्धतीने हल्ला केला. भारतीय लष्कर सशक्त असून ते नक्कीच या हल्ल्याचे उत्तर देईल. याआधीही सैन्याने अनेकदा पाकिस्तानला धडा शिकवला आहे. पंतप्रधान मोदींनीही पुलवामा हल्ल्यानंतर शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं स्पष्ट केले आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करुन पाकिस्तानला धडा शिकवावा अशी माझी मागणी आहे,’ असं मत अग्रवाल यांनी नोंदवले आहे. तसेच केवळ सर्जिकल स्ट्राइक न करता इतरही अनेक माध्यमातून पाकिस्तानची कोंडी करुन त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा द्यावी असंही अग्रवाल म्हणाले आहेत.

दरम्यान पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक सीआरपीएफच्या ताफ्यावरील बसवर धडकवून केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून सामान्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे आणि निदर्शनांच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muzaffarnagar mla demands pm modi for one more surgical strike on pakistan
First published on: 18-02-2019 at 16:16 IST