२५ वर्षांच्या एका महिलेवर तिच्या पतीच्या डोळ्यातदेखतच सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिच्या लहान मुलाच्या मानेवर नराधमांनी सुरी ठेवली आणि तिच्या पतीला मारहाण केली. पीडितेला या चारही नराधमांनी उसाच्या शेतात नेले आणि तिथेच तिच्यावर बलात्कार केला. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधे हा धक्कादायक प्रकार घडला. पीडित महिलेचा पती, महिला आणि तिचे लहान मूल हे त्यांच्या दवाखान्यात घेऊन गेले होते. तिथून हे तिघेही बाईकवरून घरी परत येत होते. त्याचवेळी चार नराधमांनी त्यांची वाट अडवली आणि बंदुकीचा धाक दाखवत या महिलेवर बलात्कार केला.

आम्ही डॉक्टरांकडून परत येत होतो, तेवढ्यात काही लोक आमच्या बाईकपुढे आले. त्यांनी माझ्या पतीला मारहाण केली. माझ्या तीन महिन्यांच्या मुलाच्या गळ्यावर त्यांनी सुरी ठेवली. मला उसाच्या शेतात खेचून नेले आणि माझ्यावर बलात्कार केला अशी माहिती या पीडित महिलेने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. एवढेच नाही तर या प्रकारची वाच्यता कोणाकडे कराल तर याद राखा, अशी धमकीही आम्हाला या नराधमांनी दिली असेही या पीडितेने ‘एएनआय’ला सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. पीडित महिला आणि तिच्या पतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. नराधमांचा शोध सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. यामुळे देशातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.