म्यानमारमध्ये थडग्यांमधून ४५ मृतदेह बाहेर काढले
म्यानमारमध्ये हिंदूंची मोठय़ा प्रमाणावर कत्तल करण्यात आली असून, तेथे सापडलेल्या थडग्यांमधून अधिकाऱ्यांनी रविवारपासून ४५ हिंदूंचे मृतदेह उकरून काढले आहेत. रोहिंग्या मुस्लीम दहशतवाद्यांनी त्यांचे प्राबल्य असलेल्या रखाइन प्रांतात गेल्या वर्षभरात किमान १६३ लोकांना ठार मारले असून, अद्याप ९१ लोक बेपत्ता आहेत, असा दावा म्यान्मारच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
काळ्या कापडाने चेहरे झाकलेल्या काही लोकांनी पश्चिम म्यान्मारमधील हिंदू वस्ती असलेल्या एका खेडय़ावर हल्ला केला आणि भयभीत गावकऱ्यांना पर्वतीय भागाकडे घेऊन गेले. तेथे त्यांनी अनेक लोकांना निर्दयपणे कोयत्याचे घाव घालून ठार मारले.
यानंतर दहशतवाद्यांनी ३ भलेमोठे खड्डे खणून मृत लोकांना त्यात फेकून दिले. या लोकांचे हात पाठीमागे बांधले होते आणि त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती, असे रिका धर हिने पत्रकारांना सांगितले. पती, २ भाऊ आणि अनेक शेजाऱ्यांची अशाप्रकारे हत्या होताना डोळ्यांनी पाहिलेली रिका तिच्या २ मुलांसह बांगलादेशात पळून गेली व सध्या तेथील हिंदूंच्या शिबिरात राहात आहे.
रखाइन प्रांतातील खा माँग सेक या हिंदूंच्या लहानशा खेडय़ात हा रक्तपात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले. या ठिकाणीच म्यानमारच्या अधिकाऱ्यांनी ४५ मृतदेह बाहेर काढले आहेत. म्यान्मारच्या लष्कराच्या सांगण्यानुसार, २५ ऑगस्ट रोजी मुस्लीम रोहिंग्या दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडाचा हा पुरावा आहे. याच दिवशी घूसखोरांनी पोलीस चौक्यांवर सुनियोजित पद्धतीने हल्ले केल्यानंतर धार्मिक रक्तपात उसळला होता.लष्कराने या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिल्यानंतर शेकडो रोहिंग्या मरण पावले आणि सुमारे ५ लाख निर्वासित बांगलादेशला पळून गेले. हा लष्करप्रणीत हिंसाचार असल्याचा या लोकांचा आरोप असून, संयुक्त राष्ट्रसंघाने त्याचे वर्णन वांशिक स्वच्छता असे केले आहे.
लष्कराने मात्र हा आरोप फेटाळून लावताना, रोहिंग्यांसारख्या ‘कडव्या दहशतवाद्यांविरुद्ध’ आपल्या मोहिमेचे समर्थन केले आहे. बौद्ध व हिंदू लोक या दहशतवाद्यांच्या क्रूरतेचे बळी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे.
म्यानमारच्या रखाइन प्रांतात पत्रकारांना जाण्यास असलेली बंदी उठवून लष्कराने या ठिकाणी पत्रकारांचा दौरा आयोजित केला होता. यावेळी म्यान्मार व बांगलादेशातील विस्थापित हिंदूंकडून त्यांना या छळकहाण्या ऐकायला मिळाल्या. चेहरे झाकलेले लोक कोण होते हे एक महिला सांगू शकली नाही, मात्र आम्ही हिंदू असल्यामुळेच आम्हाला लक्ष्य करण्यात आल्याचे ती म्हणाली.
म्यानमार लष्कराचा दावा
रखाइन प्रांतात रोहिंग्या मुस्लीम दहशतवाद्यांनी किमान १६३ लोकांना ठार केले असून ९१ लोक अद्याप बेपत्ता असल्याचे म्यान्मार सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑक्टोबर २०१६ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत रखाइन प्रांतातील हल्ल्यात किमान ७९ लोक ठार झाले आणि स्थानिक अधिकारी, सरकारी नोकर व सुरक्षा दलांचे कर्मचारी यांच्यासह ३७ बेपत्ता आहेत. अकारान रोहिंग्या सॅल्वेशन आर्मीने (एआरएसए) २५ ऑगस्टला किमान ३० पोलीस चौक्यांवर हल्ला केला, त्या दिवसापासून आणखी ८४ लोकांना ठार मारण्यात आले आणि ५४ लोक बेपत्ता आहेत, असे सांगण्यात आले. रखाइन प्रांतात गेल्या रविवारी २ सामूहिक थडग्यांमधून २८ मृतदेह, तर याच भागातील दुसऱ्या थडग्यातून सोमवारी १७ मृतदेह उकरून काढण्यात आले. एआरएसएच्या हल्ल्यांपासून बेपत्ता असलेल्या सुमारे १०० हिंदूंपैकीच हे ४५ मृतदेह असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.