पंजाबमध्ये अमली पदार्थ  व शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात लष्करातील नाईक व इतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. भारत-पाक सीमेवर ही तस्करी ड्रोनच्या माध्यमातून सुरू होती त्यात जीपीएस नियंत्रित ड्रोन हे पाकिस्तानी व्यक्तींच्या सहकार्याने वापरले गेले होते असे पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृतसर जिल्ह्य़ातील एका खेडय़ात निर्मनुष्य हवाई वाहने उतरली होती व हरयाणात कर्नाल खेडय़ातही असाच प्रकार ऑगस्ट २०१९ मध्ये झाला होता. त्यानंतर चार महिन्यांनी या सगळ्या प्रकाराचा छडा लावण्यात आला आहे.

पंजाब पोलीस प्रमुख दिनकर गुप्ता यांनी सांगितले की, या प्रकरणात चिनी बनावटीचे दोन ड्रोन, १२ ड्रोन बॅटरी, काही ड्रोन कंटेनर, काडतुसे, दोन वॉकी टॉकी संच व ६.२२ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. अमली पदार्थ विकून आलेले हे रोख पैसे होते असे समजते. पण या वेळी त्यांच्याकडून अमली पदार्थ मात्र जप्त करण्यात आलेले नाहीत. यावेळी छाप्याच्या कारवाईत लष्करात नाईक पदावर काम करणारा राहुल चौहान याला यात अटक करण्यात आली आहे.

आम्ही तीन जणांची टोळीच पकडली असून ते भारताच्या पाकिस्तानलगत सीमेवर ड्रोन पाठवत होते. त्या मार्गाने अमली पदार्थ आणले जात होते, असे गुप्ता यांनी सांगितले.

अमली पदार्थाबरोबर छोटी शस्त्रेही यात पाठवली जात होती त्यात पिस्तुलांचा समावेश होता. चौहान याच्या मित्राच्या हरयानातील कर्नाल येथील घरी छापा टाकून हेक्झ्ॉकॉप्टर (ड्रोनचा प्रकार)  जप्त करण्यात आले. दोन ड्रोन जप्त करण्यात आले असून त्यातील एक क्वाडकॉप्टर आहे ते अमृतसरमधील मोधे खेडय़ातील एका सरकारी दवाखान्याच्या आवारात ठेवलेले होते. भारतात बनावट नोटा, हातबॉम्ब, सॅटेलाइट फोन, शस्त्रास्त्रे पाठवण्यासाठी या ड्रोन्सचा वापर केला  जात होता. नाईक चौहान याची यात मोठी भूमिका होती. तो ड्रोन  खरेदी व पुरवठा यात सहभागी होता. त्याने या ड्रोनचा वापर करण्याचे प्रशिक्षण तस्करांना दिले होते. राहुल चौहान हा अंबाला छावणी क्षेत्राचा रहिवासी असून ड्रोनच्या फेऱ्याचे नियंत्रण करीत होता व हेरॉइन तसेच शस्त्रांची पाकिस्तानातून तस्करी करीत होता. इतर दोन आरोपींची नावे धर्मिदर सिंग ( धनोआ खुर्द, अमृतसर) व बलकार सिंग (सारा अमानत खान, अमृतसर) अशी आहेत. धर्मिदर याला हाडरे रत्तन या भारत पाक सीमेपासून ३ कि.मी अंतरावरील गावात पकडण्यात आले तर बलकार सिंग याला अमृतसर तुरुंगात ठेवलेले असून तो अमली पदार्थ तस्करीत सामील होता. त्याचे सहकारी त्याला मदत करीत होते.

अमृतसर जिल्ह्य़ातील मोहावा खेडय़ात एका भाताच्या शेतात सप्टेंबरमध्ये ड्रोन सापडले होते. ते चिनी बनावटीचे हेक्झ्ॉकॉप्टर होते व त्याला सहा विद्युत मोटारी होत्या. त्याची क्षमता २१ किलो वजन नेण्याची होती. तस्करी करणाऱ्या टोळीतील दोन जण बेपत्ता आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naik two others arrested for arms smuggling abn
First published on: 12-01-2020 at 01:24 IST