काँग्रेसने धनाढय़ांना जनतेच्या पैशाचा गैरवापर करू दिला. मात्र आम्ही अशी बँकांची कर्जे बुडवणाऱ्या व्यक्तींना क्षमा करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय मल्या प्रकरणातील सरकारवरील टीकेला उत्तर दिले.
कर्जबुडव्यांना कारागृहात जाण्याची भीती वाटत असल्याने ते पळत आहेत. काँग्रेसच्या काळात श्रीमंतांसाठीच बँका उघडल्या. हा पैसा जनतेचा आहे. त्यामुळे प्रत्येक पैशाचा हिशेब जनतेला देऊ, असे मोदी यांनी येथील प्रचारसभेत जाहीर केले. सरकारच्या अनेक धोरणांमुळे दलालांची साखळी आम्ही नष्ट केली आहे. गरिबांची ६० वर्षे काँग्रेसने लूट केली. मात्र आता आम्ही ते होऊ देणार नाही. गेल्या सहा दशकांत ४० टक्के जनतेने बँकेत पाऊल टाकले नव्हते. मात्र जनधन योजनेत गरिबांना बँकेत खाती उघडता आल्याचे मोदींनी सांगितले. आमच्या सरकारच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय जगतात देशाची प्रतिष्ठा वाढल्याचे सांगितले.