यूपीए सरकार परराष्ट्र धोरणाच्या मुद्यावर अपयशी ठरले असून अतिशय कमकुवत नेते सध्या देशात राज्य चालवीत आहेत, अशी खरमरीत टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली.अमेरिकेतील वीस शहरांत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना त्यांनी सांगितले, की गेल्या बारा वर्षांच्या राजवटीत आपण विकासाची व्याख्या बदलून टाकली आहे. सध्या जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणे हेच भारतासमोरील मोठे आव्हान आहे, असे सांगून भ्रष्टाचाराच्या मुद्यावरही मोदी यांनी काँग्रेसला धारेवर धरले.
मोदी यांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमही झाला. जेव्हा देशातील शासनकर्ते हे कमकुवत असतात तेव्हा देशाची काय हानी होते हे मला माहीत आहे. गेल्या महिनाभरात भारतात जे काही घडले त्यावरून याची कल्पना येईल. चीनने सैन्य मागे घेतले, पण भारतीय लष्करानेही आपल्याच भूमीत माघार घेतली हे पाहून आपल्याला धक्का बसला.
पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली त्या पाश्र्वभूमीवर मोदी म्हणाले, की दिल्लीतील सरकारला माझा साधा प्रश्न आहे, चीनने आपल्या भूमीत घुसखोरी केली, ते माघारी गेले ही एक गोष्ट झाली, पण भारताने आपल्याच भूमीतून माघार घेण्याचे कारण काय, त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.
मोदी म्हणाले, की आपल्या सैनिकांचा शिरच्छेद केला जाऊ शकतो याची कल्पना तरी तुम्ही करू शकाल काय, पण आपल्या पंतप्रधानांनी या घटनेनंतर काही दिवसांतच पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चिकन बिर्याणी खिलवली. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चीन आपल्या दरवाजावर दस्तक देत आहे हा एक प्रश्नच आहे. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी जयपूर येथे मार्च महिन्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांच्या सन्मानार्थ खाना दिला.
मोदी यांनी असा दावा केला, की गुजरात मॉडेलने विकास एका नव्या उंचीवर गेला आहे. विश्वासाचा अभाव हे देशापुढचे आव्हान आहे. लोकांचा व्यवस्थेवर पुन्हा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.
आपल्या देशात सध्याचे मोठे आव्हान काय आहे असे लोक आपल्याला विचारतात, सध्या कुणाचा कुणावर विश्वास नाही.
देशातील लोकांचा संस्थांवरील विश्वास उडाला आहे. आपल्या मते तेच खरे मोठे आव्हान आहे. लोकांचा विश्वास पुन्हा मिळवणे, व्यवस्था, धोरणे, हेतू, प्रक्रिया, नैतिकता यावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
‘चीनने आमच्या प्रदेशातून माघार घेतली, पण भारतीय सैन्याने आपल्याच भूमीतून माघार घेतली, त्यामुळे लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.’