लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासहित पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे केंद्रात सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पुन्हा एकदा केंद्रात आमची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नरेंद्र मोदींना एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता अमित शाह सर्वेसर्वा असल्याचं सांगत त्यांना उत्तर देण्यास सांगितलं.
पाच वर्षात एकदाही पत्रकार परिषद न घेतल्याने नरेंद्र मोदींना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला उपस्थित असल्याने ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पूर्ण बहुमत मिळून त्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली आहे असं सांगताना पुन्हा एकदा पूर्ण बहुमत असलेलं सरकार येईल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे.
‘भारत हा जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जगावर आपल्या देशानं छाप सोडली पाहिजे असं मला वाटतं. आपल्या देशात विविधेतली एकता आहे आणि ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र होतात. रमजान, ईस्टर, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, हनुमान जयंती सगळं एकत्ररित्या सुरू आहे. सोशल मीडिया आल्याने पत्रकारांनाही कष्ट उपसावे लागले आहेत. निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराचा खूप चांगला अनुभव होता’, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
मोदींच्या पत्रकार परिषदेत मागचे दरवाजेही बंद करण्यात आले – राहुल गांधी
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचीही पत्रकार परिषद सुरु झाली होती. यावेळी त्यांनी थेट प्रश्न विचारत माझ्यासोबत राफेलवर चर्चा का करत नाही ? अशी विचारणा केली आहे. नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेला उपस्थित असण्यावरुन टोला लगावताना निवडणुकीचे निकाल लागण्याच्या पाच दिवस आधी पत्रकार परिषद घेत आहेत असं सांगितलं. यावेळी राहुल गांधी यांनी मोदींच्या पत्रकार परिषदेत मागचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत असा आरोप केला. मी आपल्या बाजूने दोन तीन पत्रकार पाठवा असं सांगितलं होतं, जेणेकरुन आपले प्रश्न विचारले जातील. पण दरवाजे बंद करण्यात आले आहेत असं राहुल गांधींनी सांगितलं.