नवी दिल्ली : शताब्दी साजरी करत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केला. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी संघाच्या उल्लेखावरून पंतप्रधानांवर टीका केली. भाजपनेही त्याला प्रत्युत्तर देत, देशाचे समाजभान घडविण्यात संघाचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट केले.

‘येथे गर्वाने सांगू इच्छितो की, शंभर वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. व्यक्तीनिर्माणापासून राष्ट्रनिर्माणापर्यंत संघाचे मोठे योगदान आहे. लक्षावधी स्वयंसेवकांनी देशासाठी जीवन समर्पित केले. संघ जगातील सर्वांत मोठी ‘एनजीओ’ आहे’, अशा शब्दांत पंतप्रधानांनी संघ कार्याचा गौरव केला.

काँग्रेसची टीका

पंतप्रधानांनी संघाचे कौतुक करणे घटनात्मकदृष्ट्या आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाचे उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेसने केला. संघाचे लांगूलचालन करण्याचा हा प्रयत्न होता, अशीही टीका काँग्रेसने केली. पंतप्रधान आज थकल्यासारखे वाटले, लवकरच ते निवृत्त होतील, असा टोला काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी लगावला. लोकसभा निवडणूक निकालानंतर ज्या घटना घडल्या, त्या पाहता पंतप्रधानांचे स्थान कमकुवत झाले आहे. आता सप्टेंबरनंतर पंतप्रधान पदावर टिकून राहायचे असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांचा विश्वास संपादन करावा लागेल, असा दावाही रमेश यांनी केला.

भाजपचेही प्रत्युत्तर

विरोधकांच्या टीकेला भाजपने उत्तर दिले. देशाच्या सार्वजनिक जीवनाला संघ विचारांनी आकार दिला असल्याचे मत भाजप समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी व्यक्त केले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी संघाला १९६३ मध्ये प्रजासत्ताक दिनी संचलनासाठी आमंत्रित केले होते. तसेच देशभक्तांची संघटना असा उल्लेख केला होता अशी आठवण मालवीय यांनी करून दिली. पंतप्रधानांवर टीका करणारा काँग्रेस पक्ष वस्तुस्थितीपासून दूर आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

पंतप्रधानांकडून शहिदांचा अवमान’

संघाचा इतिहास संशायास्पद असताना पंतप्रधानांनी त्या संघटनेचे कौतुक करणे अत्यंत अनुचित असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एम.ए.बेबी यांनी केली. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी आली होती. तसेच जातीय दंगे भडकवण्याबाबत संघाच्या भूमिकेबाबत इतिहासकारांनी दस्तऐवजात नोंद ठेवल्याचा दावाही बेबी यांनी केला.